ई-टोल भरा आणि 10 टक्के सूट मिळवा

ई-टोल भरा आणि 10 टक्के सूट मिळवा

Updated: Mar 19, 2016, 02:42 PM IST
ई-टोल भरा आणि 10 टक्के सूट मिळवा title=

नवी दिल्ली : देशभरात यापुढे राष्ट्रीय महामार्गावर तुम्ही भरत असलेल्या टोलमध्ये तुम्हाला 10 टक्के सूट मिळणार आहे. पण, ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला ई-टोल प्रणाली वापरावी लागणार आहे.

केंद्र सरकारने काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गांवर ई-टोल सुविधआ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मिंट या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार 1 एप्रिलपासून देशभरातील 357 टोलनाक्यांवर ई-टोल वसूली सुरू केली जाणार आहे.

देशभरात आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक किंवा अॅक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत ग्राहकांना 100 ते 150 रुपयांचे ई-टोलचे स्टिकर्स विकत घेता येतील. वाहनाच्या प्रकाराप्रमाणे हे स्टिकर्स असतील. काही दिवसांनी ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवरही हे स्टिकर्स विकले जातील.

 टोल नाक्यावर पोहोचल्यावर एका स्कॅनर मार्फत हे स्टिकर स्कॅन केले जातील आणि तुमच्या खात्यातून ही रक्कम वजा होईल. ई-टोल भरल्याने ग्राहकांचा वेळ वाचेल, तसेच इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल.

आत्तापर्यंत देशभरातील 300 राष्ट्रीय महामार्गांच्या टोलनाक्यांवर यासाठीची यंत्रणा लावण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत उर्वरित 57 टोलनाक्यांवर ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे.