नवी दिल्ली : मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते.
'दिल्ली कमिशन फॉर वुमन'नं हस्तक्षेप केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. 'द हिंदू' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी या मुलीची तिच्याच घरातून सुटका करण्यात आलीय.
श्रृती (बदललेलं नाव) हिला तिच्याच घरात... तिच्याच आईवडिलांनी १४ ऑगस्ट २००९ पासून घरात कोंडून ठेवलं होतं... इंटरनेट किंवा फोनलाही हात लावण्याची परवानगी नव्हती.
२५ वर्षांच्या श्रुतीचे एका मुस्लिम तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचं तिच्या आई-वडिलांना समजलं... त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला एका खोलीत कोंडलं... पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आत्महत्या करू, अशी धमकीच तिच्या आईनं तिला दिली. तर घराण्याची अब्रू धुळीत मिळवली तर मुलीचाच खून करू, असं तिच्या वडिलांनी धमकी दिली.
तब्बल सात वर्षांनी श्रुतीला एक संधी मिळाली. आई आंघोळीला गेली असताना श्रुतीनं १८१ या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली. आज श्रुती ३२ वर्षांची आहे. आपल्या आई-वडिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय श्रुतीनं घेतलाय.