लखनऊ : देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
लखनऊमध्ये बोलताना सिब्बल म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा मुस्लिमांना बसला आहे, कारण बहुतांश मुस्लिमांचं बॅंकेत खातं नसतं. मी दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राहतो आणि तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, मी मुस्लिमांशी जोडला गेलो असल्याने मला याबाबत माहिती आहे असं सिब्बल म्हणाले. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
शनिवारी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करताना सिब्बल म्हणाले, नोटबंदीचा सर्वात जास्त परिणाम मुसलमानांवर झाला आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद्याचा खात्मा होणार नाही कारण दहशतवादाचा पैशाशी काहीही संबंध नाही,
पैशासाठी कोणी दहशतवादी बनत नाही असंही सिब्बल म्हणाले. नोटबंदीमुळे गरिबांनाही कोणताच फायदा होणार नाही या उलट नोटबंदी हे घातक पाऊल असल्याचं ते म्हणाले.