स्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता

स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 30, 2013, 11:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश काँग्रेसनं मात्र केंद्राच्या निर्णयाविरोधात भूमिका घेण्याचे संकेत दिले असून मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही राजीनाम्याचा इशारा दिलाय. त्यामुळं तेलंगणावरून काँग्रेसमध्येच तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
घोषणा... जाळपोळ... हे सगळं काही सुरु आहे केवळ स्वतंत्र तेलंगणासाठी... आंध्रप्रदेशच्या विभाजनाच्या हालचालींना वेग आला असून स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीचा निर्णय मंगळवारच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची चिन्ह आहेत. या बैठकीनंतर लगेचच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीनंतर स्वतंत्र तेलंगणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी आणि प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण यांना राजधानीत हजर राहण्याचे निर्देश काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.

२००९ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीच्या चंद्रशेखर राव यांनी आमरण उपोषण पुकारले आणि स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सुरूवात केली. त्यानंतर तेलंगणाचा मुद्दा अधिकच पेटला. आता निवडणुकांच्या तोडांवर तेलंगणाबाबत निर्णय घेण्याची काँग्रेसची खेळी आहे. मात्र, केंद्रात काँग्रेस तेलंगणाच्या बाजूनं असली तरी राज्यातली काँग्रेस मात्र आंध्रप्रदेशच्या विभाजनाच्या विरोधात आहे. आंध्रचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे भाजपनंही डाव साधत सत्तेत आल्यास तासाभरात तेलंगणाची निर्मिती करणार असल्याचा निर्धार भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलाय. त्यामुळं काँग्रेसवरील दबाव वाढलाय.

तेलंगणाचं विभाजन झालं तरी सरकारपुढं खरं आव्हान आहे ते हैदराबादचं... हैदराबादला केंद्रशासित प्रदेश करून दोन्ही राज्याची संयुक्त राजधानी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, हैदराबाद केवळ तेलंगणाचीच राजधानी करण्याची मागणी करून यावर कुठलीही तोडजोड केली जाणार नसल्याची भूमिका तेलंगणा राष्ट्र समितीनं घेतलीय. त्यामुळं तेलंगणाची निर्मिती झाली तरी हैदराबादचा पेच लगेचच सुटेल अशी सुतराम शक्यता नाही. आंध्राचं विभाजन करून तेलंगणाचा प्रश्न सुटणार असला तरी देशातल्या इतर राज्यांमधील विभाजनाचा प्रश्न जन्माला येणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.