काँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?

काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 19, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
देशातील स्थलांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसच उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेला लक्ष्य केले. मात्र, गेले काही वर्षे या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळवून देण्यात मनसे हा महत्त्वाचा घटक असल्यानेच मनसेचा उल्लेख टाळला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
परप्रांतीयांना महाराष्ट्रात त्रास दिला जातो आणि त्यासाठी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा पुढाकार असतो, असे राहुल गांधी यांनी दिल्ली निवडणूक प्रचारात म्हटले होते. परप्रांतीयांवरून राहुल गांधी यांनी शिवसेनेवर टीकाही केली. शिवसेनेने १९७०च्या दशकात परप्रांतीय आणि विशेषत: दाक्षिणात्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पुढे शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यावर शिवसेनेचा प्रांतीयवाद काहीसा मावळला होता.
तर गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टॅक्सीचालक आणि फेरीवाल्यांना चोप दिल्यावर त्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटली होती. परप्रांतीयांच्या मुद्दय़ावर नेहमीच राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून टीका केली गेली आहे. परंतु राहुल गांधी यांनी दिल्लीतील परप्रांतीय मतदारांना आपलेसे करण्याकरिता शिवसेनेवर टीका केल्याचे म्हटले जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी शिवाजीपार्कवर काँग्रेसची अनुपस्थिती दिसून आली. नेमके त्याच दिवशी राहुल गांधी यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याने काँग्रेस नेत्यांचा निर्णय योग्यच ठरला. काँग्रेससाठी मनसे महत्त्वाचा! गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला होता. त्यामुळे मनसेला राहुल यांनी दुखावण्याचे टाळले असावे, असे म्हटले जात आहे.
राज ठाकरे यांच्यामुळे तिरंगी लढत झाल्यास ती काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना मनसेचा उल्लेख झाला होता. मनसे कोणती भूमिका घेते यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारीक लक्ष आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेताच राहुल गांधी यांनी परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे किंवा मनसेचा उल्लेख टाळलेला असावा, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.