बंगळुरू : कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.
या वादामुळे कर्नाटक आणि तमिळनाडूमधला तणाव वाढत चाललाय. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी कावेरी वादामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आलीय.
राजधानी बंगळुरूच्या के.पी.एन. बस डेपोमध्ये असलेल्या तब्बल ५५ बस आंदोलकांनी पेटवून दिल्यात. या खासगी बस कर्नाटक सरकारच्या परिवहन विभागानं भाडे तत्वावर घेतल्या होत्या. यांचा मूळ मालक तामिळी असल्याचं सांगितलं जातंय.
दिवसभर सुरू असलेलं आंदोलन या घटनेनं अधिक चिघळल्याचं स्पष्ट होत असून केंद्रानं राखीव दलाच्या १० तुकड्या बंगळुरूकडे रवाना करण्यात आल्यात. तोडफोड आणि आगीच्या बातम्यांदरम्यान ऑफिसकडे निघालेल्या कामकाजी लोकांनी घरी राहणंच पसंत केलंय. काही कंपन्यांनी आणि शाळां-कॉलेजांनी स्वत:हून सुट्टी घोषित केलीय.