नवी दिल्ली: महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार बनेल, असं म्हणत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलंय. अर्थात अमित शहा यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे एका दगडात दोन पक्षी असल्याचं मानलं जातंय.
काँग्रेसप्रणित आघाडी सरकारला त्यांनी टार्गेट करतानाच, राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असं त्यांनी सुचवलंय. काँग्रेस शासीत राज्यांची दूरवस्था झाली असल्याचं ते म्हणालेत. दिल्लीत भाजपची आज एक दिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू आहे. या परिषदेत अमित शहा यांनी केलेल्या भाषणात अनेकांवर टीका केली. दक्षिणेकडच्या राज्यात भाजपचं सरकार बनवण्याची प्रबळ इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसंच बिहारमध्येही पोटनिवडणूक जिंकून सरकार स्थापन करण्याचा एल्गार त्यांनी केला.
भाजपाचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं सांगताना राज्यात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूचित केलं. शाह यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि आपण अध्यक्ष होणं हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितले.
या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, अरूण जेटली यांच्यासह पक्षाचे दोन हजार नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदी- राजनाथ सिंह यांच्या जोडीमुळं, त्यांच्या अथक परिश्रमांमुळं भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले, अशा शब्दांत त्यांचं कौतुक करतानाच मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची उन्नतीच होईल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.