बंगळुरू : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बंगळुरूमध्ये महिलांच्या 'सामूहिक विनयभंगा'च्या घटनेनं सगळ्या देशाला चांगलाच धक्का बसलाय. महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय... या घटनेबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी 'पाश्चिमात्य अनुकरण' जबाबदार असल्याचं बेताल विधान केलंय.
'या संपूर्ण घटनेसाठी तरुण-तरुणींचे पाश्चिमात्य अनुकरण जबाबदार आहे... लोक पाश्चिमात्य लोकांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात... केवळ विचार-आचार नव्हे तर कपडेही त्यांच्यासारखे घालतात...' असं परमेश्वर यांनी म्हटलंय.
मंत्री महोदयांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगानं मात्र तीव्र आक्षेप घेतलाय. यावर तिखट प्रतिक्रिया देत आयोगानं परमेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. 'गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अजिबात स्वीकारणीय नाही... महिलांचे पाश्चिमात्य पोषाख पाहून स्वत:च भान हरपायला भारतीय पुरूष इतक्या खालच्या दर्जाचे आणि दुर्बल आहेत का?' असा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी विचारलाय.