श्रीनगर: नजरकैदेत ठेवलेल्या काश्मीरच्या फुटीरवादी नेत्यांना एका तासांत सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता गिलानी सोडून सर्वांना सोडण्यात आलंय.
पाकिस्तानच्या वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं जबरदस्त उत्तर दिलंय. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांना अटक करण्यात आलीय.
हुर्रियतचे कट्टरवादी नेते सैयद अली शाह गिलानी आणि मिरवैज उमर फारूख यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं असून यासिन मलिक याला अटक करून कोठिबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय. तसंच पाकिस्तानच्या झेंडा फडकावणाऱ्या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांच्या घरावरही छापा टाकला आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र या अटकसत्राबद्दल नाराजी नोंदवत सरकारच्या कारवाईवर टीका केली आहे.
येत्या २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार असून पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज दिल्लीत येणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान उच्चायोगानं मंगळवारी रात्री काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांना निमंत्रण देत कुरापत काढली आहे. फुटीरतावाद्यांचा मुद्दा उकरून काढत पाकनं पुन्हा आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या चर्चेत फुटीरतावाद्यांचा सहभाग असता कामा नये, ही भारताची भूमिका आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.