योगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.

Updated: Mar 4, 2015, 08:45 PM IST
योगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला title=

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. या बैठकीला पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते.  याच बैठकीमध्ये योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, केजरीवाल यांनी बुधवारी सकाळीच पक्षाच्या निमंत्रक पदाचा राजीनामा दिला  होता. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा फेटाळला.

आपमध्ये गेले काही दिवस अंतर्गत वाद उफाळून आला. पक्षात नव्याने वादाला तोंड फुटले होते. त्यातच यादव यांच्या उचलबांगडीमुळे आणि केजरीवाल यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे नवे वळण मिळाले.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस यश पदरात टाकल्यानंतर आपमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत धुसफुस सुरु झाली. केजरीवाल व्यथित झाले होते. पक्षांत सुरू असलेला संघर्ष किळसवाणा असून, त्यामुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि ही जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे, असे केजरीवाल यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर आपला राजीनामा सादर केला.

आपल्याला दिल्लीतील कारभारावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. या प्रकारांमुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि दिल्लीकरांशी प्रतारणा केल्यासारखे वाटत आहे, त्यामुळे कोणत्याही स्थितीत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.
 
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर 'आप'मधील मतभेद उघड झालेत.  स्वतः योगेंद्र यादव यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोणताही मोठा निर्णय होणार नाही, असे म्हटले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.