www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये कृषी विभागात कार्यरत असलेले बी. डी. गुहा यांनी आश्चर्यकारक पद्धतीनं नारळाच्या साहाय्यानं रक्त गट शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढलीय. कोणत्याही व्यक्तीला स्पर्श न करता केवळ १० सेकंदांमध्ये या पद्धतीनं व्यक्तीचा रक्तगट सांगता येतो.
तसं पाहिलं तर आत्तापर्यंत नारळ केवळ मंदिरांमध्ये फोडण्यासाठीच वापरलं जायचं... याच नारळाच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीचा रक्त गटही सांगता येऊ शकतं, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. पण, गुहा यांच्या दाव्यानुसार, याच नारळाच्या साहाय्याने सिलिंडर भरलेला आहे की रिकामा किंवा जमिनीखाली पाणी आहे किंवा नाही... किंवा जमिनीखालील सुरंग शोधून काढता येऊ शकतात.
व्यक्तीचे आठ रक्त गट ए पॉझिटीव्ह, ए निगेटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, एबी निगेटीव्ह, बी पॉझिटीव्ह, बी निगेटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह असतात. गुहा यांच्या म्हणण्यानुसार, यातील पाच रक्त गट ए पॉझिटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, बी पॉझिटीव्ह, ओ पॉझिटीव्ह आणि ओ निगेटीव्ह केवळ नारळाच्या साहाय्यानं ते ओळखू शकतात. इतर तीन रक्त गटांच्या बाबतीत शोध अजून सुरू आहे.
वेगवेगळ्या रक्त गटांच्या बाबतीत नारळ वेगवेगळ्या दिशेनं का फिरतो, यामागच्या वैज्ञानिक कारणाचा ते सध्या शोध घेत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या मुली सोनाली, मोनाली आणि मुलगा आयुष मदत करतोय. कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणारे गुहा यांचे तीनही मुलांना यामागचं वैज्ञानिक कारण लवकरच शोधून काढता येऊ शकतं, असा विश्वास आहे.
नारळाच्या साहाय्याने कसा समजतो रक्तगट
गुहा यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या डोक्याच्या थोडं वरती हातात नारळ द्यावा. थोड्याच वेळात नारळ वेगळ्या दिशेला फिरतो. ज्या जागेवर भूमिगत पाणी किंवा पाण्याची पाईपलाईन तिथे मात्र नारळ योग्य दिशा दर्शवण्यात असमर्थ ठरतो.
ए पॉझिटीव्ह रक्त गट असेल तर नारळ ४५ डिग्री अंश कोनात वळतो. एबी पॉझीटीव्ह असेल तर ४५ ते ५५ डिग्री, बी पॉझिटीव्ह असेल तर ६० डिग्री, ओ पॉझिटीव्ह असेल तर ९० डिग्री आणि ओ निगेटीव्ह असेल तर १८० डिग्री अंश कोनात वळतो.
कसा लागला हा शोध
गुहा सांगतात, २००५ साली बलौदाबाजारमधल्या एका शाळेत पाण्याचा स्रोत सांगण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं होतं. `तेव्हा काही लहान मुलं खेळत होती... त्यांचा दंगा थांबविण्यासाठी मी त्यांना एका रांगेत उभं राहायला सांगितलं... आणि म्हटलं की मी पत्ता लावतो, तुमच्यात पाणी आहे की नाही....`
`गंमतीमध्ये केलेल्या या परीक्षणादरम्यान पाहिलं तर काही मुलांच्या डोक्याच्या थोडं वरती हातात ठेवलेलं नारळ ९० डिग्रीमध्ये उभं राहिला. मी हाच प्रयोग घरी येऊन माझ्या मुलांवर करून पाहिला. तेव्हाही तेच झालं. लॅबमध्ये मुलांचा रक्त गट तपासला तर तो ओ पॉझिटीव्ह निघाला... आणि माझी चिकित्सक बुद्धी आणखी कामाला लागली,` असं गुहा यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.