वाराणसी : मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
इतकेच नाही तर या गुलाबजाम सेवनाने त्यांचे आरोग्यही सुधारणार आहे. मावा, मैदा आणि साखरेसोबत यात तुळस आणि ओटचा वापर केला आहे ज्यामुळे हे गुलाबजाम आरोग्यास फायदेशीर ठरणार आहेत.
बीएचयू कृषी विज्ञान संस्थेतील पशुपालन आणि दुग्धविज्ञान विभागातील एमए दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या मानवेंद्र सिंह या विद्यार्थ्याने या गुलाबजामची कल्पना मांडली आहे.
गुलाबजाम बनविण्यासाठी मावा, मैदा आणि साखरेची आवश्यकता असते, परंतु मानवेंद्र सिंह याने या हर्बल गुलाबजाममध्ये ओट आणि तुळस यांचा वापर केला आहे. गुलाबजाममध्ये 80 टक्के मावा तर 20 टक्के मैदा वापरला जातो परंतु मानवेंद्र सिंहने हे मैदा प्रमाण 15 टक्के तर 5 टक्के ओटचा वापर केला आहे. ओट ग्लुटेनफ्री असते. ग्लुटेन एक असे प्रोटीन असते जे ऊर्जा निर्माण करते.
मैद्यामध्ये हे प्रोटीन असते. ओटमध्ये बेटाग्लूकेंस असते जे कोलेस्टरॉल कमी करते. त्यामुळे हे गुलाबजाम ह्रदयरोगाने त्रस्त लोकांच्या आरोग्यास फायदेशीर ठरणार आहेत. सोबतच तुळशीचाही वापर या गुलाबजाममध्ये केला आहे.
मानवेंद्र सिंह म्हणाला की आपल्या संस्कृतीत कोणताही सण, उत्सव मिठाईविना अपुरा असतो. परंतु आज लोकांना अशा आजारांनी ग्रासले आहे ज्यामुळे त्यांना मिठाईविना सण साजरे करावे लागतात. अशा लोकांना हे गुलाबजाम फायदेशीर ठरणार आहेत.
विभागाचे प्रमुख प्रा. दिनेश चंद्र म्हणाले की हे गुलाबजाम लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहेत. विभागाने यापूर्वी हर्बल आइसस्क्रीम बनविले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.