मुंबई: चहाची तल्लफ सहन होत नाही. कामाच्या रगाड्यात डोक भरकटून जातं अशावेळी घोटभर गरमागरम चहा घशाखाली गेला की, कशी तरतरी येते... हुरूप येतो, पण हा हुरूप, तरतरी तेवढ्यापुरती... चहामुळे एक नव्हे हजार दुखणी मागे लागतात. जराशी तलफ पण नंतर महागात पडते. त्यामुळे सावध व्हायचं असेल तर आताच व्हा... कमीत कमी उन्हाळ्यात... एप्रिल-मे किंवा ऑक्टोबर हीटमध्ये तरी ‘चहा’ नकोच...
महिनाभर चहा न पिता राहून तर बघा... नाही तर ‘ग्रीन टी’शी जुळवून घ्या!
‘कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे ‘ऍन्टीऑक्सिडन्ट’नामक पदार्थ केवळ कोर्या चहात आहे पण दूध साखर घालून उकळलेला चहा भूक मारतो. आयुर्वेद शास्त्रानुसार अग्निमांद्य घडवतो. जास्त प्रमाणात अती उकळलेल्या चहामुळं पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध असे विकार मागे लागतात. आपल्याकडे तर चहात साखर घालण्याचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळं बैठा व्यवसाय करणार्यांना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा हायफाय रोगांशी दोस्ती करावी लागते.
दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळं मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणं, असे विकार बळावतात. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
खरं तर आपल्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचं पेय नाही. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळं होतं. शौचाचा वेग निर्माण करणं, हे चहाचं काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्यानं हाडं ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो. काहीवेळा चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळं चहा शरीराला मारक बनतो.
‘अल्झायमर्स’चा धोका
टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’(स्मृतिनाश)सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.