वाजपेयींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसचा मोदींवर निशाणा

`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2014, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`नमो`चा विजयरथ रोखण्यासाठी आता काँग्रेसला भाजपाचेच वरिष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचा वापर करायची वेळ आलीय.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर (काँग्रेस डॉट इन) मोदींचा फोटो वापरलाय. `मोदींनी राजधर्माचं पालन केलं नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाच्याही योग्यतेचं समजत नव्हते, भविष्यात त्याच व्यक्तीच्या हातात तुम्ही देशाचं भवितव्य सोपवाल का?` अशा ओळी या फोटोखाली लिहिल्या गेल्यात.
'नो बडी टू रिमाईंड बीजेपी ऑफ इट्स राजधर्म' अशा शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात वाजपेयींचं गुणगाण करत काँग्रेसनं मोदींवर टीका केलीय. 'भाजपमध्ये वाजपेयीच्या बरोबरीचा एकही नेता नाही. पक्षाच्या या संस्थापक अध्यक्षांनी सहा वर्षांपर्यंत देशाची धुरा सांभाळली. २००४ मध्ये काँग्रेसकडून मात मिळाल्यानंतर वाजपेयी यांनी स्वत: मान्य केलं होतं की मोदी शासनकाळात झालेल्या दंग्यांमुळे त्यांना पराभवाचा धक्का बसला'
'खरं म्हणजे, वाजपेयींना मोदींविरुद्ध कारवाई करण्याची इच्छा होती. ही गोष्ट एनडीए सरकारचमध्ये मंत्री राहिलेल्या जसवंत सिंह यांनी उघड केली होती. मोदींविरुद्ध कारवाई झाली नाही तर आपण राजीनामा देऊ, अशा शब्दांत वाजपेयींनी पक्षाला धमकी दिली होती... वाजपेयींच्या पीडेमागचं कारण होतं मोदींचं राजधर्म न पाळणं... त्यांनी मुख्यमंत्री धर्म पाळला नाही, आपल्या कर्तव्यांचं पालन केलं नाही... वाजपेयींनी मोदींनी जाती, धर्म आणि रंगाच्या आधारावर लोकांना विभाजित न करण्याचाही सल्ला दिला होता. यामुळेच हे स्पष्ट होतं की गुजरातचे मुख्यमंत्री दंगा रोखण्यासाठी अपयशी ठरले सोबतच गुजरातीयांसोबतही भेदभाव केला'.
'एवढं जाणून घेतल्यानंतर हा प्रश्न निर्माण होतो की भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याला ज्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावरून हटवायचं होतं तो व्यक्ती पक्षाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कसा असू शकतो' असं काँग्रेसच्या वेबसाईटवर म्हटलं गेलंय.
भाजपनं मात्र काँग्रेसच्या या कृतीवर आक्षेप घेत काँग्रेसच्या वेबसाईटवरून वाजपेयींचा फोटो हटवण्यास सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.