www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर खडबडून जाग्या झालेल्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मंत्रिमंडळात उद्या फेरबदल होणार आहे. राजभवनात उद्या सकाळी दहा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
नंदुरबार इथून आपल्या मुलीला भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत फौजिया खान यांनी सहकार्य न केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तिथं राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं फौजिया खान यांना हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळंच फौजिया खान यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे मात्र उद्याच्या या विस्ताराबात काँग्रेसकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.