www.24taas.com, झी मीडिया, बीड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वर नाव न घेता टीका केली आहे. "मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलत नसतो. त्यातही उगीच कशाला कोणाचं नाव घ्यायचं! तेवढं महत्त्व असेल तरच नाव घ्यावं. पण माझ्या नावाने काही जण झोपेतही बरळतात", अशा शब्दात शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांची खिल्ली उडवली.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार म्हणाले, `ज्या व्यक्तीने एकदाच उपमुख्यमंत्री पद मिळवलं. ती व्यक्ती कधी दिल्लीत मंत्री तर कधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहे. मी संसदेत असताना पाहिलं आहे. बीडच्या खासदारांनी बीड जिल्ह्याबाबत एकही प्रश्न विचारला नाही, असा खासदार भविष्यात बीड जिल्ह्याचा विकास कसा करू शकेल?`
शरद पवारांनी भाषणाची दिशा नरेंद्र मोदींकडे वळवत `मी लोकसभा निवडणूक लढवत नाही आहे. मग माझा पंतप्रधानपदाशी संबंध काय? काँग्रेसचं सरकार गुजरात मध्ये असताना, गुजरातचा विकासदर १७ टक्के होता. पण हाच विकासदर नरेंद्र मोदींच्या काळात ९ टक्कयांवर आला. ज्यांनी गुजरातचा विकासदर कमी केला, त्यांना आता देशाचा विकासदर कमी करण्यासाठी पंतप्रधान व्हायचं आहे. पण देशातील लोकं त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.