www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं वाकयुद्ध चांगलंच रंगलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा हवाला ऑपरेटशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेत हे आरोप केले. यावेळी काही फोटो आणि सीडी दाखवण्यात आल्या, यात हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेली व्यक्ती अफरोज फट्टा हे नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांसोबत दिसत आहेत.
सुरजेवाला यांनी या पत्रकार परिषदेत फट्टा आणि मोदींचे संबंध असल्याचा आरोप केला. फट्टा हा भाजपचा समर्थक असून त्याने मोदींची भेट घेतली होती, असेही त्यांनी परिषदेत दावा केला.
तसेच या व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या महिन्यात सुरतमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने 700 कोटींचे हवाला रॅकेट उघड केले असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.