www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन म्हणाले की, "जातीच्या नावावर मत मागणी करून समाजात जातीय तेढ निर्माण करून आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणीचे नरेंद्र मोदींविरोधात तक्रारपत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठविलं आहे. तसंच फैजाबाद इथल्या मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ आणि मंचावरील भगवान श्रीरामाच्या पोस्टर्सची छायाचित्रंही आम्ही निवडणूक आयोगाला पुरावा म्हणून पाठविली आहेत. यावर त्वरित कारवाई करून मोदींना अटक व्हावी अशी मागणी केली आहे."
पश्चिम बंगालमधील प्रचारसभेत ममता बॅनर्जी म्हणतात, "जो व्यक्ती दंगलींमुळं ओळखला जातो, अशा व्यक्तीला देशाचा पंतप्रधान होण्याचा कोणताही अधिकार नाही. आचारसंहितेचा भंग करून निवडणूक आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी मोदींना तुरूंगात पाठवायला हवं. मोदींच्या नावाचा पोकळ आश्वासनांचा फुगा भाजपतर्फे फुगविण्यात आला आहे. निकालानंतर हा फुगा नक्कीच फुटेल." असा विश्वासही बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.