www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सर्वात आवडता मतदारसंघात ठाणे.... पुनर्रचनेपूर्वी लोकसंख्येनुसार भारतातील दुसरा सर्वात मोठा असा हा मतदारसंघ... साधा नगरसवेकही नसलेल्या सामान्य शिवसैनिकाला चार वेळा संसदेत पाठवणारा हा मतदारसंघ......
तलावांचं शहर अशी ओळख असलेलं ठाणे हे अतिशय जुनं शहर आहे... मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात ठाणे शहराचे उल्लेख आहेत. इटालियन प्रवासी मार्को पोलोने 1290 मध्ये ठाण्याला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे. पोर्तुगीजांनी या शहरावर सुमारे 200 वर्षे राज्य केले. 1784 पासून हे शहर इंग्रजांकडे गेलं... ब्रिटिशांच्या दूरदृष्टीनेच 1853 मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली होती. या शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलाय... गडकरी रंगायतन ही या शहराची शान आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला ग्लोबल स्वरूप देण्याचं श्रेयही ठाणेकरांनाच आहे. कुंजविहार आणि राजमाताचा वडापाव, मामलेदार मिसळ आणि टिप-टॉपच्या मिठाईची चव ज्याने चाखली नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही.
मुंबईसारखंच ठाणे हे देखील महत्त्वाचं बंदर होतं. इथं झपाट्यानं औद्योगिक वसाहती वाढल्यानं या शहराचं चित्रच पालटून गेलं. मुंबईची धाकटी बहिण म्हणून सुनियोजित नवी मुंबई शहराचा आराखडा सिडकोने आखला... पण आता हा डोलारा कोसळू लागलाय... जी गत मुंबईची झालीय, तीच ठाणे आणि नवी मुंबईचीही... उंचच्या उंच बिल्डिंग, भपकेबाज मॉल्स, नेहमी गजबजलेले रस्ते... चालायलाही जागा नाही असं रेल्वे स्टेशन... खच्चून भरलेल्या माणसांना घेऊन जाणा-या बसेस ही ठाण्याची नवी ओळख....
ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तीन शहरांचा मिळून हा ठाणे लोकसभा मतदारसंघ बनलाय...
ठाणे लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये 18 लाख 6 हजार 803 मतदार होते. यांपैकी 8 लाख 8 हजार 11 महिला, तर 9 लाख 98 हजार 792 पुरुष मतदार आहे....
पुनर्रचनेआधी हा मतदारसंघ शिवसेनेचा गढ होता. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं, अशी शिवसेनेची घोषणाच होती. परंतु सध्या या गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाईक घराणं राज्य करतंय. अगदी सुरुवातीला प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसचे खासदारही इथून निवडून आले होते.
जनसंघाच्या मुशीत घडलेल्या रामभाऊ म्हाळगींनी 1977 साली भारतीय लोकदलाच्या आणि 1980 मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर लोकसभा गाठली. त्यांच्या निधनांतर 1981 ला झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे जगन्नाथ पाटील विजयी झाले. 1984 साली काँग्रेसच्या शांताराम घोलपांनी बाजी मारली... 1989 आणि 1991 मध्ये भाजपच्या राम कापसेंनी इथून लोकसभा जिंकली. त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेने कब्जा केला. 1996 पासून 2004 पर्यंत प्रकाश परांजपेनी लागोपाठ चारवेळा शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपेही खासदार झाले. 2009 च्या निवडणुकीत परांजपे कल्याणला शिफ्ट झाले आणि भगवा खाली उतरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे ठाण्याचे विद्यमान खासदार आहेत.
विधानसभा मतदारसंघातील संख्याबळ पाहिलं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारल्याचं जाणवतं.
ठाण्यातून राजन विचारे, कोपरी-पाचपाखडीमधून एकनाथ शिंदे आणि ओवळा-माजीवड्यातून प्रताप सरनाईंक हे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेत. तर मीरा-भाईंदरमधून राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, ऐरोलीतून संदीप नाईक आणि बेलापूरमधून उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक हे तिघे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
मुलगा खासदार, दुसरा मुलगा आमदार तर वडिल मंत्री आणि आमदार अशी नाईकांची घराणेशाही सध्या इथं राज्य करतंय...
कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्याने ना घर ना घाट का, अशी ठाणे मतदारसंघाची अवस्था झालीय... सुसंस्कृत म्हणून ओळखलं जाणा-या ठाणेकरांच्या नाड्या निर्ढावलेल्या राजकारण्यांच्या हातात आहेत... राजकीय नेतृत्व आहे, पण त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीच नसल्याने ठाण्याला ओंगळवाणं रूप आलंय...
ठाणे लोकसभा मतदारसंघात कोणाचं किती मतदान आहे त्यावर एक नजर टाकूया...
ठाणे मतदारसंघात हिंदू धर्मिय मतदारांची प्रमाण 70 टक्के आहे. आग्री-कोळी समाजाचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. मुस्लिम 14 टक्के, दलित 10 टक्के, ख्रिश्चन 4 टक्के, जैन 4 टक्के अशी मतदारांची वर्गवारी आहे. परप्रांतियांची संख्याही ठाण्यात लक्षणीय म्हणजे 30 टक्क्यांपर्यंत आहे.