www.24taas.com, झी मीडिया, बुलढाणा
विदर्भाचं पंढरपूर असलेलं शेगाव, जगप्रसिद्ध खा-या पाण्याचे लोणार सरोवर, तसंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेबांचं जन्मस्थान असलेल्या मतदारसंघाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. चला तर मग जाऊया या मतदारसंघात...
बुलढाणा म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ओळख पटवायची झाली, तर 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं इथलं लोणार सरोवर वर्ल्ड फेमस आहे. खा-या पाण्याचं हे सरोवर पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक अभ्यासक तसेच लाखो पर्यटक याठिकाणी येतात.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाबाई यांची जन्मभूमी असलेले मातृतीर्थ सिंदखेडराजाही याच मतदारसंघाचा भाग आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या श्रीसंत गजानन महाराजांची संतनगरी शेगावसुद्धा याच मतदारसंघात आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले सैलानीबाबा यांचा सैलानी दर्गा सुद्धा याच मतदारसंघात आहे.
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाण्यात कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि सुर्यफूलाचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. खामगाव-मलकापूर ही महत्त्वाची औद्योगिक शहरेही याच मतदारसंघात आहेत. मराठी साहित्यातील थोर नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हटकरांचा जन्मही बुलढाण्यातलाच. 1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यानंतर काँग्रेसला हा गड राखणं जमलेलं नाही.
1984मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुखदेव नंदाजी काळे यांनी बाजी मारली. 1991मध्ये मुकुल वासनिकांच्या रूपात काँग्रेसने कमबॅक केलं खरं. मात्र 1996मध्ये आनंदराव अडसूळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या जागेवर आपलं स्थान बळकट केलं.
1998मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. तर 1999 आणि 2004मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर विजयी झाले.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे एकूण सात विधानसभा मतदार संघ येतात. त्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 1977 ते 2009 पर्यंत हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. 2009 मध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला.
2009 मध्ये बुलढाणा मतदारसंघातली मतदार संख्या 13 लाख 82 हजार 736 एवढी होती. यामध्ये 7 लाख 21 हजार 215 पुरूष, तर 6 लाख 61 हजार 521 महिला मतदारांचा समावेश होता.
हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यापासून सुरू होऊन, मराठवाडा सीमेला लागून असलेल्या लोणार तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. इथली आघाडी आता शिवसेना टिकवून ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची ओळख
नाव - खा. प्रतापराव गणपतराव जाधव
जन्म - 25 नोव्हेंबर 1960
वय - 54 वर्ष
शिक्षण - द्वितीय वर्ष (बी.ए)
सुमारे चार दशकं राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये खुला झाला. आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी 1995 ते 2009 या कालावधीत मेहकर मतदारसंघातून प्रतापराव आमदार म्हणून निवडून आले होते.
1997 ते 1999 या काळात युती सरकारमध्ये जाधवांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. अन्न सुरक्षा योजना लागू करण्यासाठी खासदारांची जी समिती तयार करण्यात आली होती त्यातही समिती सदस्य म्हणून खासदार जाधवांचा समावेश होता.
खासदार प्रतापराव जाधवांचं इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व नसलं, तरी मतदारसंघातील त्यांची पकड मजबूत आहे. खासदार जाधवांनी मतदारसंघात तीन ते साडे तीन वर्षांत अगदी मोजकाच खासदार निधी खर्च केला होता. परंतु आता लोकसभा निवडणुकांची चाहुल लागताच खासदार निधीतून जाधवांनी मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाकाच लावलाय.
2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 53 हजार 671 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवा