www.24taas.com, मुंबई
गणपती बाप्पाच्या आगमनावर खड्ड्यांचं विघ्न कायम आहे. मुंबईत साडेसात हजार हजार खड्डे बुजवण्यात कुचराई करणाऱ्या २४ कंत्राटदारांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली असली तरी ही निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीनं केलाय.
मुंबईत सोमवारच्या मुसळधार पावसानं शहरातल्या रस्त्यांची चाळण झालीयं. मुंबईत साडेसात हजार खड्डे असल्याचं मुंबई महापालिकेन मान्य केलयं. या खड्डयांमुळे मुंबईतल्या गणेशाच्या आगमनावर संकट निर्माण झालयं. हे खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरलेल्या २४ कंत्राटदारांकडून पालिकेन ५७ लाखाचा दंड वसूल केलाय. तीन वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी १५० कोटी खर्च झालाय.
खड्डे बुजवण्याचा खर्च दरवर्षी वाढतोय, मात्र खड्डयांची समस्या जैसे थे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीच्या तक्रारीनंतर पालिकेन कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केलीय. मात्र, ही तर मुंबईकराच्या डोळ्यात धुळफेक असल्याची टीका होतेय.
इतरांची संकटं दूर करणाऱ्या विघ्नहर्त्याच्या आगमनावर खड्ड्यांमुळं संकंट निर्माण झालंय. कंत्राटदारांवर कारवाई करुन ते दूर होणार नाही. आता महापालिका त्यातून कसा मार्ग काढते ते पहावं लागेल.