www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आजची पिढी फक्त व्हॉटसअप आणि फेसबुकवरच बिझी असते, असा खडूस शेरा काही वेळा कानावर पडतो. पण आजची पिढी सजग आहे आणि तितकीच प्रगतही आहे. उलट समाजातले प्रश्न टेक्नॉलॉजीच्या मदतीनं कसे सोडवता येतील, त्याची उत्तम जाण त्यांना आहे.
कोण म्हणतं आजची पिढी फक्त व्हॉटसअप आणि फेसबुकवर बिझी असते....? कोण म्हणतं तरुण पिढीला सामाजिक समस्यांचं भान नाही? उलट आजची पिढी व्हॉटसअप आणि फेसबुकवर बिझी असली तरी ती त्याच माध्यमातून सामाजिक समस्याही सोडवतेय. पिंपरी-चिंचवडमधल्या तरुणांचा हा ग्रुप असंच मस्त काम करतोय. या तरुणांनी `आयएमसी` पुणे अर्थात `Improve Your City` हे अॅप्लिकेशन तयार केलंय. या तरुणांनी फक्त पॉकेट मनी वापरून हे अॅप्लिकेशन तयार केलंय. शहरातल्या कुठल्याही भागात कुठलीही समस्या असेल तर त्याचा फोटो काढायचा आणि तो पोस्ट करायचा. गुगल मॅपला हे अॅप्लिकेशन कनेक्टेड आहे. अशा प्रकारे एखाद्या भागातली समस्या कळली, की ती सोडवण्यासाठी हे तरुण संबंधित खात्याकडे पाठपुरावा करतात.
सध्या या ग्रुपमध्ये ३७ जण आहेत. शहरातल्या आणखी तरुणांनी पुढे येऊन ग्रुप जॉईन करावा, आणि शहर सुधारण्यासाठी मदत करावी, असं आवाहन हे तरुण करतायत.
शहरातली सुधारणा असो किंवा राजकारणाचं चित्र बदलायचं असो. तरुणांनाच हा बदल घडवायचाय आणि त्यासाठी ही पिढी सजगही आणि प्रगतही आहे. फक्त आता गरज आहे या प्रयत्नांना जास्तीत जास्त तरुणाईची साथ मिळण्याची.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.