मुंबई विद्यापीठ इंजिनिअरिंग निकाल गोंधळाचा कळस

मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या निकालांचा गोंधळाचा कळस गाठलाय. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल तर लावला त्यात अक्षम्य चुका केल्यामुळं हजारो विद्यार्थ्यांतं भवितव्य धोक्यात आलं असून मनस्ताप सहन करावा लागतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2014, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या निकालांचा गोंधळाचा कळस गाठलाय. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल तर लावला त्यात अक्षम्य चुका केल्यामुळं हजारो विद्यार्थ्यांतं भवितव्य धोक्यात आलं असून मनस्ताप सहन करावा लागतोय.
बॅचलर्स इन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा दिलेला हा नीरज तुपे. गेल्या महिन्यात त्याच्या सेमिस्टर-7 चा निकाल लागला, ज्यात डीटीएसपी या विषयात त्याला फक्त 11 गुण मिळाले. इतर सर्व विषयात तो पास असून त्याला फर्स्ट क्लास आहे. एवढंच नव्हे तर त्याला गेल्या सहा सेमिस्टर्समध्येही फर्स्ट क्लास मिळालाय. मिळालेल्या गुणांची शहानिशा करण्यासाठी नीरजनं उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवली आणि उघड झाला मुंबई विद्यापीठातला एक धक्कादायक प्रकार.
आपल्या सीट नंबरची उत्तरपत्रिका फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची असल्याचं नीरजला समजलं आणि त्याची झोपच उडाली. कारण नीरजची प्लेसमेंट एका चांगल्या कंपनीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळं त्याला कंपनीत निकालतच देता येत नाही.
साबू सिद्दीकी कॉलेजची ही झरीन सय्यद. नेहमी पहिल्या पाचमध्ये येणा-या झरीनच्या पेपरचे विद्यापीठानं बारा वाजवले आहेत. सहाव्या सेमिस्टरमध्ये 82 टक्के गुण मिळवणा-या झरीनला एका पेपरमध्ये केवळ 12 मार्क्स देण्याचा करिश्मा मुंबई विद्यापीठानं करून दाखवलंय. काहींनी तर परिक्षा दिलेली असूनही त्यांना अनुपस्थित दाखवण्यात आलंय. यावरून विद्यापीठाचं परिक्षा नियंत्रण कक्ष झोपेत होतं की काय अशी शंका येते.
विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला बळी पडलेले नीरज आणि झरीनसारखे तब्बल 21 हजार विद्यार्थी आहेत. गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे मारावे लागतायत. मात्र या घोळाचं उत्तर विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रकांकडे नाही. दोन दिवसांत पुन्हा निकाल लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
उत्तरपत्रिका स्कॅन करणाचं कंत्राट मिळालेल्या माईंड लॉजिस्टिक या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मनविसेनं दिलीय. विद्यापीठानं दोन दिवसांत पुर्नमुल्यांकन केलं नाही तर विद्यार्थ्यांना के.टीची परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिका तपासल्याच नाहीत अशांचा निकाल विद्यापीठ कसा काय लावू शकतं ? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाच्या प्रकार बंद करण्यासाठी विदयापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर पाऊल उचलणार का? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे तरी याकडे लक्ष देणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.