सिद्धार्थ कॉलेजचा गोंधळ... एक कॉलेज दोन प्राचार्य

गेल्या काही वर्षांपासून कायम वादाच्या भोव-यात असलेल्या फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एकच प्राचार्य असतो.. परंतु इथं मात्र दोन प्राचार्य बसतात. त्यापैकी असली कोणता आणि नकली कोणता, हे कुणालाच सांगता येणार नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2013, 11:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही वर्षांपासून कायम वादाच्या भोव-यात असलेल्या फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एकच प्राचार्य असतो.. परंतु इथं मात्र दोन प्राचार्य बसतात. त्यापैकी असली कोणता आणि नकली कोणता, हे कुणालाच सांगता येणार नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं हे सिद्धार्थ कॉलेज. या कॉलेजमध्ये सध्या 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र कॉलेजचा प्राचार्य कोण, याबाबत त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. गेल्या 29 जुलै रोजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्राचार्य कृष्णा पाटील यांना निलंबित केल्याचं विधान परिषदेत जाहीर केलं. मात्र आपल्याला निलंबित केलंच नसल्याचा दावा कृष्णा पाटील यांनी केलाय. तर याचवेळी कॉलेजचे उपप्राचार्य म्हस्के यांना विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्षांनी प्राचार्यांचं प्रभारी पद दिलं. या सगळ्या घोळामुळे आता नेमका प्राचार्य कोण... पाटील की म्हस्के? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.
सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून सिद्धार्थ कॉलेजचं कामकाज पाहणारे म्हस्के यांनी दुसरे प्राचार्य कृष्णा पाटील यांच्यावर थेट आरोप केलेत. पाटील हे कामकाजात अडथळा आणतात असा आरोप प्राध्यापकांनीही केलाय.

मुळात प्राचार्य ठरवण्याचा अधिकार असलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या विश्वस्त मंडळावरूनच वाद सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्राचार्य कोण हे ठरवण्याबाबत संभ्रम निर्माण झालाय. या सावळ्यागोंधळामुळे गेल्या जुलै महिन्यापासून सिद्धार्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा पगारही झालेला नाही.. कारण वेतन बिलांवर कोणी सह्या करायच्या, हा देखील अजूनच वादाचाच विषय आहे.
एक फुल, दो माली.. हा प्रकार सर्वांनाच माहित आहे.. पण एक कॉलेज आणि दोन प्राचार्य... हा प्रकार बुचकळ्यात टाकणारा आहे. उच्च शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग याकडे लक्ष देणार की नाही, असा सवाल यानिमित्तानं विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाही सतावतोय...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.