www.24taas.com, झी मीडिया, रोहतक
हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.
रोहतक येथे खच्चून भरलेल्या बन्सीलाल स्टेडियममध्ये हरयाणा विरूद्ध मुंबई ही रणजी मॅच रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. त्यातच हाफ सेंच्युरी झळकावून पीचवर उभ्या राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे. सीझनचा पहिला रणजी विजय साजरा करण्याच्या उंबरठ्यावर मुंबईची टीम उभी आहे. सेकंड इनिंगमध्ये 241 रन्सवर ऑलआऊट झालेल्या हरियाणाने मुंबईसमोर विजयासाठी ठेवलेल्या 240 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईची पुन्हा अडखळती सुरूवात झाली. वासिम जाफर अवघा 1 रन काढून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कौस्तुभ पवारने इनिंग सावरली. मात्र त्यांना हाफ सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं. तेव्हा अनुभवी बॅट्समन सचिन तेंडुलकरने पीचवर पाय रोवत मुंबईची इनिंग हळूहळू पुढे नेण्यास सुरूवात केली. मात्र दुस-या एंडकडून त्याला तितक्याच तोलामोलाची साथ लाभत नव्हती... तरीही मास्टर ब्लास्टरने बाणेदारपणे खेळ करत तब्बल 105 बॉल्सचा सामना करताना 4 फोरच्या मदतीने हाफ सेंच्युरी पूर्ण झळकावली आणि मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईच्या 6 आऊट 201 रन्स झाले असून चौथ्या दिवशी मुंबईला विजयासाठी आणखी 39 रन्सची आवश्यकता आहे. नेहमी संकटकाळी टीम इंडियाच्या मदतीला धावणाऱ्या सचिन तेंडुलकर वरच मुंबई टीमचीही मदार असणार आहे. त्यामुळे सचिन आपल्या कसदार खेळाने आपल्या अखेरच्या रणजीत किती झटपट मुंबईला सीझनचा पहिला विजय मिळवून देतो याकडेच तमाम सचिनच्या फॅन्सचं लक्षं असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.