www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मध्य प्रदेश काँग्रेसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवस काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या वृत्ताबाबत तथ्य नसल्याचे सचिनच्या सूत्रांकडून स्पष्ट झाले होते. त्यानंतर सचिनने तसे स्पष्ट केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसचा हा स्टंट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत सचिने म्हटलं आहे की, मी राजकारणापासून दूर रहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती.
आमचा प्रचारक सचिन असल्याचे शनिवारी काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते प्रमोद गुगालिया यांनी अधिकृत घोषणाही करून टाकली होती. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेसने सचिनला आणण्याचा खटाटोप केला. तसेच गुगालियांनी जाहीर केले. त्यामुळे सचिन प्रचाराला जाणार की नाही याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. त्यातच सचिनच्या सूत्रांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नसल्याने मध्य प्रदेश काँग्रेसची हवाच निघाली होती.
मध्य प्रदेश काँग्रेसच्या या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे सचिनच्याच खुलाशाने स्पष्ट झाले आह. मी राजकारणापासून दूर राहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती. त्यामुळेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी राजकारणात जाणार नाही, तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचारही करणार नाही, असे सचिन तेंडुलकर याने स्पष्ट केले आहे. सचिन सध्या हरियाणात रणजी सामना खेळत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.