फिक्सिंगच्या ‘जत्रे’त मराठी अभिनेत्रीनं उधळले रंग!

आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. यामध्ये एका मराठी अभिनेत्रीनंही ‘क्रांती’कारक प्रगती केल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 18, 2013, 09:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं शुक्रवारी जप्त केलेल्या श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काही मॉडेल्स, अभिनेत्रींचे फोटो सापडल्याची माहिती झी मिडीयाच्या सूत्रांनी दिलीय. यामध्ये एका मराठी अभिनेत्रीनंही ‘क्रांती’कारक प्रगती केल्याचं समजतंय.
संबंधित मराठी अभिनेत्रीचे श्रीसंतसोबतचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडलेत. या लॅपटॉपमध्ये काही व्हिडीओ क्लिप्सही आढळल्याची माहिती आहे. तसंच त्याच्या डायऱ्यांमध्ये अनेक मुली, अभिनेत्री, मॉडेल्सचे मोबाईल नंबर, पत्ते सापडलेत. पोलिसांनी आता या दिशेनं तपास सुरू केला असून आयपीएल स्पॉट फिक्सिंगची ‘जत्रा’ आणखी किती रंग उधळणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅँचनं शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत श्रीसंतचा लॅपटॉप जप्त केला. वांद्रेमधील सोफीटेट हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री हा छापा टाकण्यात आला. या लॅपटॉपमधून स्पॉट फिक्सिंगप्रकरणातले नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलीस हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही तपासणार असून यामुळे श्रीशांतला त्या रात्री नेमकं कोणकोण भेटलं याचीही माहिती समोर येणार आहे.

एस. श्रीसंत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकऱणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतच बीसीसीआयची रविवारी चेन्नईत बैठक होणार आहे. आयपीएल कमिशनर राजी शुक्ला यांनीही दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि दिल्ली पोलिसांना तपास कार्यात बीसीसीआय पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही दिलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.