www.24taas.com, मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज स्वत: एक ब्रॅन्ड बनलाय. २००९ साली आलेला ‘वॉन्टेड’ हा सिनेमा सलमानसाठी भलताच लकी ठरला. या सिनेमानं बॉलिवूडमध्ये एक उंची गाठली आणि त्यानंतर सलमानचा एकही चित्रपट फ्लॉप गेलेला नाही. त्याचमुळे आज सलमाननं एका मनोरंजन चॅनलसोबत तब्बल ५०० करोड रुपयांचा करार केल्याचं ऐकायला मिळतंय.
लागोपाठ सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर सलमानच्या फॅन आणि फॉलोवर्सची संख्या प्रचंड वाढलीय. अर्थातच त्याचा ब्रॅन्ड व्हॅल्यूही तितकीच मजबूत झालीय. याच ब्रॅन्ड व्हॅल्यूचा फायदा घेत सलमाननं एका एन्टरटेन्मेंट चॅनलकडे करारासाठी ५०० करोड सांगितले आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनलनंही त्याला या आकड्यासाठी होकार दिलाय, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये जोरावर आहे.
करारानुसार हे एन्टरटेन्मेंट चॅनलच पुढच्या पांच वर्षात सलमानचे सगळे चित्रपट प्रदर्शित करणार आहे. सलमान आणि या चॅनलमधला इतक्या मोठ्या आकड्याचा करार तोही जाहीररितीनं झालेला देशातील पहिलाच करार ठरणार आहे.
एका ताज्या सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियामध्ये सलमान खान हा सर्वात जास्त लोकप्रिय ठरलाय. मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही सलमानचं वर्चस्व वादातीत आहे.