www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी विपन्नावस्थेत रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळल्यानंतर बॉलिवूड जगतात चर्चांना उधाण आलं. त्यावेळेस जगदीश माळी यांना साहाय्य करणाऱ्या सलमान खाननं या घटनेनंतर अंतरा माळी हिला फोन करून चांगलंच धारेवर धरलंय.
‘जगदीश माळी गुरुवारी विपन्नावस्थेत, फाटक्या कपड्यांत रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळले आणि तू म्हणतेस की आम्हाला कुणाची गरज नाही... मग, कुणाला आहे मदतीची गरज?’ अशा शब्दांत सलमाननं अंतराला चांगलंच खडसावलंय. सलमान म्हणतो, ‘जेव्हा मला जगदीश माळी यांच्याबद्दल बातमी मिळाली तेव्हा मी अनेकांशी त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल यावर चर्चा केली. आणि राहिली गोष्ट मदतीची तर ती माझ्यासाठी फार कठिण गोष्ट नव्हती. जगदीश माळी हे बॉलिवूडमध्ये नाव कमावलेले फोटोग्राफर आहेत आणि मी जेव्हा बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होतो तेव्हा त्यांनीच माझं फोटोशूट करून मला मदत केली होती’. सलमान आपली एनजीओ ‘बीईंग ह्युमन’च्या एका नव्या स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी आला असताना पत्रकारांशी संवाद साधत होता.
‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली मिंक बरार ही आपल्या भावासोबत वर्सोवाच्या रोडवर बसलेल्या भिकाऱ्यांना घोंगड्या दान करत असताना तिला या भिकाऱ्यांच्या रांगेत जगदीश माळी आढळले होते. मिंकनं ही गोष्ट सलमानला सांगितल्यानंतर सलमाननं जगदीश माळी यांना बीईंग ह्युमनच्या साहाय्याने घरी पोहचवण्यास मदत केली होती. यावर ‘माझ्या वडील व्यसनी नाहीत. ते निराशेचे बळी ठरलेत. चुकून एखाद्या वेळेस ते आपलं इन्सुलिन घ्यायचं विसरले की अस्वस्थ होत असत... त्यादिवशीही ते इन्सुलिन घ्यायचं विसरले...’असं स्पष्टीकरण अंतरानं दिलं होतं. यावेळी आम्हाला कुणाच्याही मदतीची अथवा दयेची गरज नाही. मला माझ्या वडिलांविषयी पूर्ण आदर आहे, फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुणीतरी उगाचच हा स्टंट केलाय’असंही अंतरानं म्हटलं होतं.