रिव्ह्यू: ‘मंगलाष्टक वन्स मोअर’- जोडप्यांच्या नेमकं मनातलं सांगणारा

आपल्या सर्वांचे लाडके घना आणि राधाचा ‘मंगलाष्टक वन्स मोअर- एका लग्नाची वेगळी गोष्ट’ हा या शुक्रवारी रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला ही कथा आपल्याही घरात घडतेय, अशीच वाटणारी आहे. उत्कृष्ट संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा उत्कृष्ट अभिनय यासर्वांची सांगड आपल्याला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये बघायला मिळते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 23, 2013, 02:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या सर्वांचे लाडके घना आणि राधाचा ‘मंगलाष्टक वन्स मोअर- एका लग्नाची वेगळी गोष्ट’ हा या शुक्रवारी रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येकाला ही कथा आपल्याही घरात घडतेय, अशीच वाटणारी आहे. उत्कृष्ट संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचा उत्कृष्ट अभिनय यासर्वांची सांगड आपल्याला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये बघायला मिळते.
‘मंगलाष्टक वन्स मोअर’ ही एका लग्नाची वेगळी गोष्ट आहे...सिनेमात प्रेम आहे, नाट्य आहे, रोमान्स आहे, नातेसंबंधांमधला तणावही आहे. या नाट्याची मांडणी हळुवार आहे, पण ते नाट्य फुलवण्यात, खास करुन इंटर्व्हलनंतरच्या भागात थोडं अपयश आलेलं आहे. एक मात्र नक्की, लग्नानंतरच्या प्रेमाची, तणावाची गोष्ट असली तरी ती टिपिकल नक्कीच नाहीये. उलट लग्नानंतरचं प्रेम, जबाबदारी, एकमेकांबद्दलची काळजी, करिअरचं टेन्शन अशा सगळ्या गोष्टींभोवती फिरणारं नाट्य यामध्ये बघायला मिळतं.
सिनेमाची कथा
ही गोष्ट आहे सत्यजित आणि आरती यांची... दोघांचं लव्ह मॅरेज... सत्यजित एका रेडिओ स्टेशनमध्ये सेल्समध्ये काम करतो. त्यामुळं ताण-तणाव त्याच्या पाचवीला पुजलेले. तर गृहिणी असलेल्या आरतीचं सत्यजीत हेच जग. करिअरमध्ये यशस्वी असलेली आरती लग्नानंतर गृहिणी होणं पत्करते आणि सत्यजितमध्येच आपलं आयुष्य बघते... तर पूर्वी आरतीला भेटायला जाणारा सत्यजित लग्नानंतर कामाकडे जास्त वळतो... दोघांच्याही प्रायोरिटीज बदलतात. सत्यजितच्या बारीकसारीक गोष्टींची ती काळजी घेते. प्रत्येक गोष्टीत त्याला सूचना करणारी.. सतत त्याच्या मागेमागे असलेली.. अशी आरती. तिच्या या अतिप्रेमानं सत्यजित अस्वस्थ झालाय. त्यामुळं आपल्या रुटीन आयुष्यात काही बदल घडविण्यासाठी तो ट्रीपला जायचं ठरवतो. पण तिथं नेमकं असं होतं की सत्यजितची चिडचीड बाहेर पडते. मग काय दोघांच्या प्रेमळ संसाराची घडीच विस्कटते. मग ती घडी कशी पुन्हा बसते हे ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मध्ये दाखवलं गेलंय.
प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात असा अनुभव नक्कीच येत असणार... जेवढ्या जोड्या.. तेवढे अनुभव.. जेवढे अनुभव तेवढी त्याची उत्तरं. जिथं स्वतःच्या मनाचा थांग लागणं कठीण, तिथं जोडीदाराबद्दल काय बोलावं. अशा भावनांचा कल्लोळ कलाकृतीतून मांडला जातो, तेव्हा तो नवा अनुभव ठरतो.. समीर जोशी दिग्दर्शित `मंगलाष्टक वन्स मोअर` हा नात्यांमधली कोंडी नेटकी प्रगट करतो. परंतु, त्या कोंडीचा उतारा मात्र तितका प्रभावी ठरत नाही.
अभिनय
मुक्ता आणि स्वप्नीलच्या अभिनयाबाबत काय बोलायचं... दोघांची जोडी आणि दोघांचे अभिनय प्रेक्षकांना खूर्चीत खिळवून ठेवतात. आत्तापर्यंत साधारण बंडखोर, स्वतंत्र विचारांची अशाच रोलमध्ये मुक्ताला आपण पाहिलेलं आहे.
पण नेहमी स्वाभिमानी बाण्यात दिसणाऱ्या मुक्तानं या सिनेमात आरतीची मानसिकता नेमकी पकडली आहे. स्वतःला विसरलेल्या आरतीपासून स्वतंत्र अस्त्तित्वाचा शोध घेणाऱ्या आरतीपर्यंतचा प्रवास तिनं अतिशय उत्तम केलाय. स्वप्निल जोशीनं सत्यजित साकारतानासुद्धा चांगलीच मेहनत घेतलेली दिसतेय. आत्तापर्यंतचा स्वप्नीलचा कसदार अभिनय या सिनेमात आपल्याला बघायला मिळतो. या दोघांना उत्तम साथ मिळालीये ती कादंबरी कदम आणि सई ताम्हणकर यांची. सई ताम्हणकरही यात वेगळ्या भूमिकेत दिसते. तिनं त्या भूमिकेचा बाज नेमका पकडला असला, तरी संवादफेकीत मात्र तोच-तोचपणा जाणवत राहतो. पण कादंबरीनं रेवाची भूमिका अतिशय उत्तम साकारलीय. आपल्या मावसबहिणीला सावरणारी, तिला सावध करणारी, तिला स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी बळ देणारी अशी रेवा कादंबरीनं खूप समंजसपणे साकारली. यात खटकते ती निखिलची व्यक्तिरेखा. ती अत्यंत नाटकी बनली आहे. शेवटाकडे येता येता पटकथेची पकड आणखी सैल होऊ लागते. एकंदरित, कथा-पटकथेत थोडा फसला असला तरी सिनेमा बघण्याची कारणं बरीच आहेत.

संगीत आणि इतर
संगीतकार निलेश मोहरीरचं संगीत चित्रपटाची खासियत आहे. `उसवले धागे...`, `सांग ना...` ही गुरू ठाकूर यांनी लिहीलेली गाणीही छान आहे. विशेष म्हणजे ही सगळी गाणी बॅकग्राउंडला येत असल्यामुळं ती जास्त पोचतात. सिनेमाचा लूकही खूप आकर्षक आहे. संजय जाधव यांच्या सिनेमॅटोग्राफीची गंमत या सिनेमात पुन्हा अनुभवायला मिळेल.
एकूणच आपल्या घना-राधासाठी एकदा हा सिनेमा बघायलाच हवा...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला