संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2013, 05:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय. याचबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्र सरकारकडून मत मागवलंय. संजय दत्त हा सध्या पॅरोलवर सुटलेला असून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्तला ४२ महिन्यांची शिक्षा सुनावली गेलीय. गृहमंत्रालयानं संजय दत्तची शिक्षा कमी करण्याबद्दल महाराष्ट्र सरकारला लिखित स्वरुपात विचारणा केलीय. संजय दत्तसह इतर तीन दोषींची शिक्षा माफ करावी, अशी मागणी प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीच्या आधारावर सरकारने संजयच्या माफीसाठी प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय.
संजय दत्त हा पुण्यातील येरवडा तुरुंगात त्याला मिळालेली ४२ महिन्यांची शिक्षा भोगत आहे. गेल्या आठवड्यातच त्याच्या पॅरोल रजेत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी येरवडा तुरुंगातून तो पॅरोल रजेवर बाहेर पडलाय.
`काटजूंच्या मागणीवर आपली बाजू मांडावी अशी सूचना केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला केली आहे. पण त्यावर अजून महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलेलं नाही` अशी माहिती मिळतेय.

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला पाच वर्षांची शिक्षा टाडा न्यायालयाने सुनावली आहे. पाच पैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने आधीच पूर्ण केली आहे. त्यामुळे संजय दत्तला साधारण साडे तीन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे. संजयबरोबच जैबुन्निसा काजी, इशाक मोहम्मद हजवाने, शरीफ अब्दुल गफूर पारकर या तिघांनाही न्यायालयानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.