www.24taas.com, मुंबई
या वर्षातला बहुप्रतिक्षित ‘एक था टायगर’ आज रिलीज झाला आहे. आणि हा सिनेमा अप्रतिम बनला आहे. स्क्रीनवर सलमान खानची वाघासारखी उपस्थिती आणि कतरिनाचा पहिल्यांदाच दिसलेला जोरदार अभिनय यामुळे सिनेमा प्रेक्षणिय ठरला आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा तर्कसंगत आहे. अतिरेकी मारामारी, वेडेपणा फारसा आढळत नाही. याचं श्रेय दिग्दर्शक कबीर खानला द्यावं लागेल.
सिनेमाची कथा म्हणजे जेम्स बाँड पठडीतली अफलातून हेरगिरीची आहे. जे एजंट विनोदमध्ये जमलं नव्हतं ते हिंदी सिनेमाला ‘एक था टायगर’मध्ये मस्त जमलं आहे. सिनेमात सलमान खान रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. एक मिशनदरम्यान शत्रू पक्षातल्याच मलीच्या (कतरिनाच्या) प्रेमात पडतो. यापुढे काय घडत जातं हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहा. सिनेमातील ऍक्शन ही अक्षरशः श्वास रोखून धरायला लावते. त्यात सलमान खान-कतरिनाची केमिस्ट्रीबरोबरच रणवीर शौरीचा अभिनयही भाव खाऊन जातो. हाणामारीची दृश्यं तर धमाल उडवू देतात. हा सिनेमा आत्तापर्यंतचा बेस्ट ऍक्शन मुव्ही आहे, असं म्हटलं तरी चालेल. यातील संवादांची भट्टीही छान जमली आहे. विशेषतः सलमान खान, कतरिना आणि रणवीर शौरी यांच्यातील संवादांची जुगलबंदीतर थिएटरमध्ये धमाल उडवून देते. याशिवाय वेगवेगळ्या देशांमधली नेत्रदीपक लोकेशन्स डोळ्यांची पारणं फेडतात.
कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली कतरिना कैफने केलेला अभिनय हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. पहिल्यांदाच तिने इतका उत्कट अभिनय केला आहे. रणवीर शौरीला फारसं काम नसलं तरी त्याचा वावरही भाव खाऊन जातो. सलमान खानतर सध्या तुफानावरच स्वार झाला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्याला, अभिनयाला, स्टाइलला थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टयांची सलामी मिळते. मुख्य म्हणजे हा सिनेमा वाट्टेल ते दाखवत नाही. सिनेमा वास्तववादी आहे. मात्र मनोरंजनाच्या बाबतीत अजिबात कमी पडत नाही. डोळे झाकून तिकीट काढा, पैसा वसूल होईल.