मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?
कांदा महागल्यावर किती ठार होतात
तुम्हाला कोणतीच आकडेवारी एवढ्या जलद गतीने मिळणार नाही, एवढं अपडेट कांद्याच्या भाव वाढल्यामुळे मिळतं, कांद्याचे भाव वाढले, म्हणजे आभाळ कोसळण्यासारखं मीडियात अनेकांना वाटतं. कांदा महागल्यावर किती ठार होतात काय माहित.
सफरचंद सॉरी अॅपल
आपली त्वचा, आरोग्य चांगलं रहावं, वय वाढलं तरी आपण म्हातारे दिसू नयेत, कुणी पत्ता विचारतांना लहान मुलांनी आपल्याला काका म्हणू नये. म्हणून काही काळजीवाहू ऑफिसला जातांना, आरोग्याशी संबंधित बातम्या वाचून बॅगेत सफरचंद खातात...सॉरी अॅप्पल खातात. कारण स्टेटस आहे भाऊ, सफरचंदाला अॅपल म्हणायचं.
अॅपल खाणं स्टेटस आहे, कांदा नाही
अॅपल... चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू देत नाही, त्वचा तजेलदार चकचकीत दिसते, वैगरे वैगरे, असं बरंच काही असतं, हे अॅपल कितीही महाग मिळालं तरी चेहऱ्यावर कोणताही हावभाव, किंवा खिशाला कात्री लागत नाही. मागणी जास्त असल्याने ते दुसऱ्या देशातून आलंय, कृत्रिमरित्या प्रक्रिया केल्याने ते कितीही बेचवं लागतंय, खाताना अचानक खराब निघालं, तरी गुपचूप फेकून द्यायचं, पण कुणाला सांगायचं नाही... कारण.. स्टेटस.
हा कांदा सफरचंदाची बरोबरी करूच शकत नाही
पण कांदा... कांद्याचे दहा रूपये किलोमागे वाढले की, चर्चा...., कांदा तसा आमच्या दृष्टीकोनातून चवीचा पदार्थ, फक्त जेवण बनवतांना आणि चवीसाठी खातांना, नंतर कांदा तसा मिसळीत खाल्ला की तोंडाचा उग्र वास देणारा पदार्थ, मग हा कांदा एवढा महाग का होता. हा सफरचंदाची बरोबरी कसा करू शकतो. म्हणून तो महागला की, आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. जीव जातो, खिशाला कात्री लागते.
कांदा सर्वात जास्त वेळेस शेतकऱ्यांचा वांधा करतो
मीडियावाले मार्केट धुंडाळत फिरतात, कांदा महागला, महागला, एवढा महागला, तेवढा महागला, आणि भाव उतरल्यावर सर्व शांत.... त्यांच्या मते आला कांदा ठिकाणावर कोणं खातंय त्याला...पण कांद्यांची कॉर्पोरेटकरांच्या भाषेत प्रॉडक्शन कॉस्ट काढली आहे का तुम्ही. तो शेतकऱ्यांच्या शेतातून निदान २५ ते ३० रूपये किलोच्या भावानेच विकला जावा, एवढी मेहनत आणि त्याला लागणारा खर्च आहे.
समजून घ्या रे मित्रांनो...
म्हणून मीडियावाल्यांनी उंटावरून उतरून कांद्याच्या शेतात यावं, एखाद्या शेतकऱ्यांचा अभ्यास करावा. पाऊस कमी झाला आणि जास्त झाला, जोराचा पाऊस आला, ऊन वाढलं, रोग पडला, धुकं पडलं, पाणी जास्त झालं, पाणी कमी पडलं, थंडी वाढली तर कांद्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करा आणि मगच तुम्हाला बाजारात कांदा महागला तरी सफरचंद स्वस्तात घेतल्या सारखं वाटेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.