मुंबई, झी २४ तास, प्रतिनिधी : दुपारी १२ ची वेळ ऑफीसला वेळेत पोहचण्यासाठी शौकत खान हा तरूण सामान्य मुंबईकराप्रमाणे कळव्यावरून अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये बसला. नुकताच ८ ऑगस्ट रोजी फर्स्ट क्लासचा एक महिन्याचा पास त्यांने काढला होता. त्यामुळे बिनधास्त तो फर्स्ट क्लासमध्ये चढला...
परळला बसला धक्का
नेहमी प्रमाणे दादर आल्यावर तो दरवाज्याजवळ येऊन उभा राहिला. हातात मोबाईल... कानात हेडफोन्स.. आणि गाणी ऐकत आपल्या धुंदीत होता. परळ स्टेशन आल्यावर त्याला प्लॅटफॉर्मवर असलेल्या टीसी काकांनी पकडले. १२ दिवसांपूर्वीच तिकीट काढल्याने तो निश्चिंत होता. त्याने पास काढण्यासाठी खिशात हात टाकला तर त्याला धक्का बसला. त्याचे पाकिट नव्हते. त्याने बॅगमध्ये पाहिले. बॅगचा कप्पा-कप्पा दोन-दोनदा शोधला. पण पाकीट काही सापडत नव्हते.
पाकीट कुठेय ते लक्षात आले
शौकत विचार करत होता की आपले पाकीट कोणी मारले तर नाही ना... मग त्याने जरा विचार केला आणि लक्षात आले... काल एक ऑनलाइन पेमेंट करायचे होते. त्यामुळे ऑफीसमध्ये पाकीट काढले होते. ते आपल्या डेस्कवरच असेल हे लक्षात आले.
टीसी काका काही ऐके ना...
टीसी काकांना घडलेली हकिकत सांगितली... पण टीसी काका काही ऐकत नव्हते. मग शौकतने तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले. त्याने ऑफिसमधील आपल्या मित्राला फोन केला आणि पाकिटातून पास आणि रेल्वेच्या आयकार्डचा फोटो व्हॉट्सअॅप करायला लावला. मित्रानेही आपला मित्र अडचणीत म्हणून दुसऱ्या क्षणाला ते फोटो शौकतला पाठविले. शौकतचा जीव भांड्यात पडला. पण टीसी काका काही ऐकत नव्हते.. त्यांनी या व्हॉट्सअॅप फोटोंना मान्य केले नाही. त्यांनी नियमावर बोट ठेवला. अजून आमच्याकडे अशा सूचना आल्या नाहीत, की व्हॉट्सअॅपच्या फोटो ग्राह्य धरायच्या. मी काहीच करू शकत नाही.
शौकतने केल्या विनवण्या
शौकतने आपण पास काढला आहे. पण तो चूकून ऑफिसमध्ये राहिला. मला सोडा... मला माफ करा.. माझी चूक झाली... मी रेल्वेला किंवा तुम्हांला फसवत नाही... मी माझ्या पासचे पैसे भरले आहे. माझ्या आयडी चेक करा आणि पास वरील आयडी क्रमांकही चेक करा... मी खोटं बोलंत नाही हो... पण टीसी का व्हॉट्सअॅप मेसेज धुडकावत होते.
इतर प्रवाशांनी समजावलं
त्या प्लॅटफॉर्मवरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी टीसी काकांचा हा आडमुठेपणा पाहिला. विनाकारण प्रवाशाला त्रास होत असल्याचं पाहून टीसी काकांना अनेकांनी समजाविण्याचा प्रयत्न केला पण टीसी काका काही ऐकत नव्हते. त्यांनी नियमांची री ओढली. तुम्ही रेल्वे मंत्र्यांकडे जरी गेला तरी मी ऐकणार नाही... अशी उत्तरं देऊ लागले. तुम्हांला जे करायचं ते करा... त्यातील एकाने सांगितलं तो विदाऊट तिकीट असता तर त्याला दंड व्हायलाच हवा होता. त्याने तु्म्हांला व्हॉट्सअॅप फोटो दाखवले तरी तुम्ही ते ग्राह्य धरत नाहीत. तो मुलगा खोटं बोलणारा वाटत नाही. माणूसकीच्या नात्याने तरी तुम्ही त्याला सोडा.
टीसी काकांनी आपला हट्ट पुरवला...
शौकत आणि प्रवाशांच्या विनवण्यानंतरही टीसी काका नियमावर बोट ठेवून त्याने शौकत खानकडून ३०० रुपये वसूल केले. आम्हांला व्हॉट्सअप समजत नाही. जेव्हा सरकार हा नियम करेल तेव्हा तो मानू
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे करतील का?
वरील घटनेवरून आपल्या रेल्वे यंत्रणेने काही गोष्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रामाणिक मुंबईकरांना त्रास होणार नाही.
१) मासिक, तिमाही, सहामाही पास हा रजिस्टर मोबाईल नंबरशी जोडायला हवा.
२) पास काढल्यावर एका विशिष्ट बार कोडसह मेसेज रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.
३) तिकीट चेकरला तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी.
४) बार कोड रिडिंगसाठी एक डिव्हाइस प्रत्येक तिकीट चेकरकडे असावे.
५) मोबाईल तिकीट पुन्हा प्रिंट करून विनाकारण कागद वाया घालू नये.
६) फिजिकल तिकीट किंवा पास जोपर्यंत अस्तित्वात आहे. त्यावरही बारकोड असावा. त्याने त्याचेही सर्व डिटेल्स तिकीट चेकरच्या यंत्रणेत नोंदविले जातील.
७) विनाकारण प्रामाणिक मुंबईकर प्रवाशांना त्रास देऊ नये याचे ट्रेनिंगही तिकीट चेकरला द्यावे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.