प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई : पंधरा वर्षांच्या एकत्रित सत्तेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी तोडण्याचा निर्णय घेतलाय..काँग्रेस राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या संसारात कुरुबुरी झाल्या पण जुळवून घेत दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले.. आणि आता सत्तेसाठीच वेगळे झाले.
१९९९ ते २०१४...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात महत्वाचा ठरलेला हा काळ...
एकमेकांविरुद्ध लढत सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ मध्ये एकत्र आले....
आणि सत्तेसाठीच पंधरा वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये पुन्हा वेगळे झाले...
1999 उजाडलं तेव्हा शरद पवार होते काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि 12 व्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते...
1999 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि नाटयमय घडामोडींना सुरवात झाली...
स्थळ : नवी दिल्ली १५ मे , १९९९
लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु होती. पण या बैठकीला हजर असलेल्या शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांच्या मनात काही वेगळचं होतं...
'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान ही पदे नैसर्गिक रित्या भारतात जन्मलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठीच असावीत अशी घटनेत दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेसने करावी असा आग्रह शरद पवार, पुर्णो संगमा आणि तारिक अन्वर यांनी धरला.
सोनियांच्या इटालियन असण्याचा पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेस सहन करणं शक्यच नव्हतं. त्यामुळं कारवाई अटळ होती.
जणू एखाद्या आखिव पटकथेप्रमाणे सगळा घटनाक्रम होता..
स्थळ : नवी दिल्ली, 20 मे 1999
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीत शरद पवार, संगमा आणि अन्वर यांनी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला....
चला ! डोक्यावरचं ओझ उतरलं अशी पवारांची प्रतिक्रिया होती...
आम्हाला घराबाहेर काढून टाकल्यानं आता स्वत:च घर बांधावं लागणार असं सांगत शरद पवारांनी स्वत:चा पक्ष काढण्याची घोषणा केली..
शरद पवारांसोबत कोण कोण जाणार याची चर्चा सुरु झाली, अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील हे मुख्य नेते शरद पवारांसोबत होतेच. इतरही लहान मोठे सरदार शरद पवारांना येऊन भेटू लागले आणि शरद पवारांमागे काँग्रेसचा एक मोठा गट जाणार हे स्पष्ट होत गेलं.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची त्यावेळीही चर्चा होती.. "आम्ही भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतरावर राहणार आहोत," शरद पवार वारंवार सांगत होते. नव्या पक्षात काँग्रेस हा शब्द असेलच आम्ही काँग्रेस विचारसरणी मानतो असंही ते सांगत असत. अखेर शरद पवारांनी नव्या पक्षाची घोषणा केली...
25 मे १९९९ !
हा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थापनादिवस !
जन्मल्यापासूनच हा नवा पक्ष जोमात होता.. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा झाला.. त्याला प्रचंड गर्दी जमली.
1999 ला विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना युती अशी लढाई झाली.. काँग्रेसची भिस्त होती ती सोनिया गांधींवर, शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा होते तर भाजप-सेना युतीची मदार होती ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या करिश्मावर..
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध जोमानं लढले.. पवारांनी पाठित खंजीर खुपसला, पवार ब्रुटस आहेत त्यांचा पक्ष म्हणजे लोटस काँग्रेस आहे अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली. काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामुख्यानं लक्ष्य केलं होतं.. अखेर एकमेकांशी लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत १९९९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळवली...भाजप-सेना युतीचं सत्तेचं स्वप्नं 1999 मध्येही अधुरचं राहिलं...
1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली आणि या युतीनं 2014 पर्यंत केंद्रात 10 वर्ष तर राज्यात 15 वर्ष सत्तेची फळं चाखली...
2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनमोहन सिंग सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना मानाचं स्थान मिळालं...
राज्यातील सत्तेच्या पंधरा वर्षांमध्ये मुख्यमंत्रीपद मात्र नेहमीच काँग्रेसकडं राहिलं....
1999 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे विलासराव देशमुख....
मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी मुत्सद्दीपणानं आणि सगळ्यांना सांभाळून घेत आघाडी सरकारची धुरा समर्थपणे सांभाळली..एकाच वेळी आमदार, मंत्रिमंडळातले सहकारी, शरद पवार आणि सोनिया गांधींशी समन्वय साधत विलासराव देशमुखांनी साधत कारभार केला...उपमुख्यमंत्रीपदासह गृह, उर्जा, अर्थ, जलसिंचन अशी सगळी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे अशी विभागणी करण्यात आली.. सत्ता विभाजनाचा हा फॉर्म्यूला काँग्रस राष्ट्रवादी आघाडीनं सेना-भाजप युतीकडूनच घेतला होता..
काँग्रेसनं पंधरा वर्षांच्या काळात मुख्यमंत्री बदलाचा आपला हातखंडा प्रयोगही सुरुच ठेवला..2004 च्या निवडणुकांपुर्वी सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं.. मुख्यमंत्री बदलामागे राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन शरद पवार आहेत अशीही चर्चा होती.. 2004 च्या निवडणुका मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करत लढल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं सत्ता कायम राखली.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं विधिमंडळावर भगवा फडकवण्याचं स्वप्न अपुरचं राहिलं.. 2004 मध्ये आघाडीला पून्हा सत्ता मिळाली पण सुशीलकुमार शिंदेंना मात्र पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही.. 2004 च्या निवडणुकीनंतर विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले...2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विलासराव देशमुखांना पायउतार व्हावं लागलं. धक्का तंत्राचा वापर करत काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं .. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभार सुरुच होता.. शिवसेना आणि भाजपचे नेते आघाडी सरकारवर टीका करतच होते पण त्याला यश मिळत नव्हतं.. दरम्यानच्या काळात राज ठाकरे आणि नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यामुळं विरोधी पक्षही अडचणीत आला होता.. नारायण राणेंनी तर काँग्रसमध्येच प्रवेश करत शिवसेनेला लक्ष्य करणं सुरु केलं होतं.. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही उपमुख्यमंत्रीपदाची भाकरी अनेकदा फिरवत ठेवली होती. छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, असे अनेक चेहरे आलटून पालटून राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदी आणत होती....२००९ ची विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिली... काँग्रेसचे अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले... पण त्यांच्या कारकिर्दीला आदर्श प्रकरणामुळं फटका बसला आणि २०१० मध्ये अशोक चव्हाणांना पायउतार व्हावं लागलं...
आघाडी सरकारचा हा स्थितंतराचा काळ होता... इतकी वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता कुरघोडीचं राजकारण टोकाला गेलं होतं... काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना संपवण्याचा खेळ एकत्र राहूनच खेळत होते हे आता उघड गुपित होतं.. अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदावरुन गेल्यानंतर काँग्रेसला आदर्श प्रकरणाचे डाग धुवुन काढण्यासाठी एका मी. क्लिनची गरज होती... पृथ्वीराज चव्हाण यांना पीमओतून थेट मंत्रालयात पाठवण्याच निर्णय काँग्रेसनं घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करु शकेल असा नेता काँग्रेसला हवा होता. शरद पवार यांना विरोध हाही महत्वाचा मुद्दा होता. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी झाल्यानं राष्ट्रवादीतही बदलत्या सत्ता समिकरणांना वेग येत होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्यातल्या युद्धानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तुटण्याची जणू पायाभरणीच केली..मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचा कारभार म्हणजे एकमेकांची उणीदुणी काढणारा संसार ठरला... राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक घोटाळ्याचे आरोप होऊ लागले...सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंवर तोफा डागण्यात आल्या... टोल आणि महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याच्या आरोपांवरुन छगन भुजबळ अडचणीत आले.. गुलाबराव देवकर यांना तर जेलची हवाही खावी लागली.. सततच्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळं अजित पवार यांनी राजीनामा नाटयाचाही प्रयोग केला.. काही काळ मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून अजित दादा पुन्हा सरकारमध्ये परतले.
या धामधुमित अजित पवार शांत नव्हते त्यांना स्वबळावर मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले होते.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसमधील संबंध तुटण्यापर्यंत ताणले गेले होते तरी तुटले नव्हते... दोन्ही पक्षाचं लक्ष होतं ते 2014 च्या लोकसभा निवडणुकींच्या निकालांकडे... आघाडी तुटणार की टिकणार याचा निर्णय 2014 चे लोकसभा निवडणूक निकालावर ठरणार होतं...मोदी लाटेत केंद्रातलं काँग्रेस सरकार भुईसपाट झालं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं भवितव्यही ठरलं..2014 च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि राज्यात स्वबळावर सत्ता मिळवायचीच असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसनं बांधला.. केंद्रात हतबल झालेली काँग्रेस आणि राज्यात आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली दरी वाढतच गेली...
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकमेकांची साथ सोडली... आघाडी तोडण्याचे खापर एकमेकांच्या माथी फोडण्याची औपचारिकता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं न चुकता पुर्ण केली....
राजकारणात कोणीही कायमचा शत्रु आणि मित्र नसतो यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.