‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!

पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच... 

Updated: Sep 26, 2014, 10:13 AM IST


 

किरण खुटाळे
झी प्रतिनिधी

पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच... 

भांडारी, भांडारी राऊत, राऊत खडसे, खडसे तावडे, तावडे आदित्य, आदित्य फडणवीस, फडणवीस रावते, रावते रुढी, रुढी देसाई, देसाई माथूर, माथूर ठाकरे, ठाकरे (गुत्थी पलक, पलक कपिल, कपिल गुत्थी)... यांच्या कोर्टातून त्यांच्या... त्यांच्या कोर्टातून यांच्या... न दिसणारा बॉल एकमेकांच्या कोर्टात टोलवण्याचा विडाच जणू या महाराष्ट्राच्या ‘महा’युतीच्या ‘महा’नेत्यांनी उचलल्याचं चित्र दिसत होतं... 

कधी सिंगल्स तर कधी डबल्स जो काही टेबल टेनिसचा सामना रोज रंगतोय त्याला तोड नाही... बरं हे सारे सामने आम्ही आणि आमच्यासारख्या वृत्तवाहिन्या न थकता न थांबता (न बोर होता) रोज नव्या जोशाने नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तमाम जनतेसमोर कधी ‘कट’ तर कधी ‘अनकट’ पोहचवण्याचं प्रामाणिक काम करतायत. इथून पुढेही करत राहूच मुद्दा तो नाही मुद्दा वेगळाच आहे... बरं गंमत ही की मुद्दा नक्की काय हेही जाणून घ्यायची कोणाला इच्छा नाही. 

राज्यात आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा यावेळचा बाजार काही वेगळाच रंगलाय. काल मंगळयानाने आपला 65 कोटी किमीचा मोठा प्रवास करत भारताला आशिया खंडात ‘आघाडी’ देत मंगळाच्या कक्षेशी ‘युती’ केली आणि तीही स्वस्तात... पक्ष सुरु असताना मंगळवारी यशस्वी झाली पण पक्ष संपले तरी आमच्या नेत्यांच्या मातोश्री ते भाजप कार्यालयाच्या वाऱ्या काही थांबायचं नाव घेत नाहीत. नुसत्या वाऱ्या नाहीत तर या वाऱ्यांमध्ये प्रत्येकाच्या हातात एक फॉर्म्यूला, रोज एक नवीन फॉर्म्युला, एक फेल तर दुसरा... असे अनेक फॉर्म्युले... एखाद्या वैज्ञानिकालाही लाजवतील इतके फॉर्म्युले यांनी वापरले (प्रयत्न केला) पण सगळे फेल...


 

काल सर्वच घटक पक्षांनी आता महायुती ही आमची महायुती असेल आणि जो पक्ष (शिवसेना किंवा भाजप) आमच्यात येईल त्याला घेऊन आम्ही निवडणुका लढू अशी घोषणा केली. घटकपक्षांनी या दोन दिग्गजांनी ‘आपल्या पाठीत खंजीर खुपसण्या’पासून ते ‘लबाडांनी विश्वास घात केला’ अशा प्रकारचे गंभीर आरोपही केले. घटकपक्षांनी ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केले त्यांच्यापैकीच एकाबरोबर (आता तो एक कोण हे गुलदस्त्यातच) निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारीही दर्शवली. 

आज अखेर ‘पक्ष’ संपले असल्यानं शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक तासनतास सुरु होती आणि बैठकीत निकाल लागणारच, या आशेवर उभा महाराष्ट्र होताच... बैठक संपली आणि अचानक घटकपक्षांना गृहित धरलं आणि त्यांचा अपमान शिवसेनेने केला असा आरोपच भाजपकडून करण्यात आला आणि पुढे चर्चा सुरु राहील, असंही जाहीर करण्यात आलं... तर शिवसेनेकडून रावतेंनी भाजपला युती तोडायची घाई झालेली असल्याचं जाहीर करत युती तुटली यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं...

या सगळ्यात गंमतीची बाब म्हणजे, या सर्वांना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आपल्याला जनता पहातेय आणि याच जनतेकडे आपल्याला महिन्याभराच्या आत तोंड वर करुन आणि हात जोडून मतं मागायची आहेत याचंही भान यांना होतं की नाही हे त्यांनाच माहीत...

मी हे लिहित असताना एकीकडे राज ठाकरे आपल्या ‘मच अवेटेड’ ब्लू प्रिंटला राज्यासमोर मांडत होते तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरु झाली... त्यात महायुती तोडत असल्याचं त्यांनी खुल्या मनानं जाहीर केलं... आणि 25 वर्ष कधी हसत खेळत तर कधी एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करत एकत्र नांदलेल्या युतीचा आणि पर्यायी महायुतीच्या सूर्यास्त झाला. 

अर्थात राजकारण संपलेलं नाहीच ते संपणारही नाही... जो संदेश जनतेपर्यंत पोहोचला तो एवढाच की सत्ता समोर आहे हे दिसत असताना एका खुर्चीसाठी हा एवढा सगळा खेळ खंडोबा झाला... यात चूक कोणाची? आणि बरोबर कोण? याचा फैसला मतदार राजा करेलच... पण, एकच विचार मनात येतोय... की आज बाळासाहेब आणि मुंडेसाहेब असते तर पक्षही संपले नसते आणि युतीही झाली असती... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.