www.24taas.com, जालना
आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.
जालन्यामध्ये प्रचंड गर्दीसमोर आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलं पहिलं भाषण केलं. भाषणाच्या सुरूवातीलाच भावनिक साद घालत आपण बाळासाहेबांचे पुत्र असून कधीही हिंमत हारणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांची कर्ज माफ करावीत, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच वीजबील आणि शाळांच्यी फी देखील माफ व्हावी, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. कर्जमाफी म्हणजे भीक नाही. आज मराठवाड्यासाठी कुठलाही नेता मराठवाड्याच्या विकासासाठी राजीनामा देण्याचा इशारा करत नाही. तसंच आबा, बाबा, दादा असं म्हणवणारे मंत्री नुसतेच नावाचे आहेत, असा टोमणाही मारला. सिंचन घोटाळ्यात नाव असणाऱे अजित पवार काय मदत करणार? असा सवालही त्यांनी केला. तसंच शरद पवार यांची ‘पाणी आडवा, जिरवा’ ही योजना म्हणजे ‘पैसा आडवा, पैसा जिरवा’ अशी आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळ ग्रस्तांसाठी असलेला पैसा दुष्काळग्रस्तांवरच खर्च होतोय का हे तपासून पाहायला हवं, असा विचार उद्धव ठाकरेंनी मांडला.
मराठवाड्यातील दुष्काळावर विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठवाड्यातील जनता दुष्काळाने खचली आहे. हेलिकॉप्टरमधून येताना हा एक वाळवंटी प्रदेश वाटत होता, इतका दुष्काळ या भागात आहे. महाराष्ट्राचं बे’सहारा’ वाळवंटच झाल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
भगव्या दहशतवादाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की जर तुमच्याकडे पुरावे असतील, तर ते लपवून का ठेवले आहेत? ओवैसी आणि त्याच्यासारखे भारताचे पाकिस्तान करू इच्छिणाऱ्यांवर हल्लाबोल करत अशा ओवैसींच्या मेहरबानीवर आम्ही जगत नाहीत, असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला.