www.24taas.com, उस्मानाबाद
गुजरात राज्य दूध उत्पादनामध्ये पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात का पिछाडीवर पडतोय? महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं काय चित्र आहे.
एकीकडे गुजरात राज्यात दूध उत्पादनांची परदेशवारी होत असताना महाराष्ट्रात मात्र अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचं दिसत आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे उस्मानाबादमधले दिलीप देशमुख. उस्मानाबादच्या तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघाचे ते निलंबित कर्मचारी आहेत. जिल्हा दूध संघात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार वरिष्ठांकडे केल्यामुळे तत्कालीन संचालक मंडळानं त्यांना निलंबनाची शिक्षा दिलीय. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांचा हा संघर्ष एकट्यानंच सुरु आहे. मात्र भ्रष्टाचार करणारे अद्यापही मोकाटच आहेत.
उस्मानाबादच्या तुळजाभवानी जिल्हा दध संघामध्ये सन 2000 ते 2006 या कालावधीत 1 कोटी 88 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. य़ा घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा विशेष लेखा परिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र त्यांनी घोटाळ्यातल्या आरोपींना क्लीन चिट दिली. धक्कादायक बाब म्हणजे पदाधिका-यांचा प्रवासखर्च म्हणून 37 लाख 34 हजार दाखवण्यात आला. त्यासाठी दूध संघाच्या पावतीवर जीप आणि कारचे जे नंबर दाखवण्यात आले ती वाहनं चक्क लुना आणि मोटर सायकलचे असल्याचं आर.टी.ओकडील पडताळणीत उघड झालंय. मात्र तरीही जिल्हा विशेष लेखा परिक्षकांच्या चौकशी अहवालात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचं दाखवण्यात आलं. मात्र अशाप्रकारे चौकशी अधिका-यानंच भ्रष्टाचार दडपल्याचं झी 24 तासच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध झालंय.
नव्या सहकार कायद्यामध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार थांबवणारी एकही नवी तरतूद या कायद्यात करण्यात आली नाही. त्यामुळे नव्या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना पुनर्जीवन देणे हे दिवास्वप्न च ठरण्याची शक्यता अधिक आहे.