बँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!

सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 25, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय. या आत्महत्येस बँक व्यवस्थापक आणि राज्य सरकार जबाबदार असून यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केलीय.
बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या अरुण पवार यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीयकृत बॅँकेकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे हे कर्ज थकलं. परंतु मागच्या वर्षी दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने कर्ज देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार कर्जाचे पुनर्गठन करावे याकरिता पवार यांनी बँकेत अनेक हेलपाटेही घातले. परंतु बँक प्रशासनाने छळवणूक केल्यानं वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप पवार यांच्या मुलाने केलाय.

पवार यांच्या आत्महत्येस राज्य सरकार आणि बॅँक प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे बुलडाणा जिल्हा बॅँकेला अद्यापही सरकारी मदत मिळू शकली नाही. त्यामुळेच पवार यांना राष्ट्रीयकृत बॅँकेकडून कर्ज घ्यावं लागलं.
जिल्हा केंद्रीय बँकेला राज्य शासनाने मदत करावी याबाबतचे वृत्त याअगोदरही ‘झी मीडिया’नं दाखवलं होतं. त्यावेळी सरकार जागं झालं असतं तर कदाचित अरुण पवार यांचा जीव वाचला असता. आता या आत्महत्येनंतर तरी सरकार जागं होणार का? हा प्रश्न कायम आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.