वर्धात वणा नदीत बोट बुडाली

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2013, 10:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतमजुरांना घेऊन जाणा-या या बोटीत ३० पेक्षा जास्त जण होते. यामधल्या २० जणांना वाचवण्यात यश आलंय. चंद्रपुरहून एनडीआरएफचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झालंय. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती वर्ध्याचे जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी दिलीय. या घटनेनंतर बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या पाच जणांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले.
वणा नदीत हिंगणघाट येथे एका बोटीमध्ये ३० पेक्षा अधिक जण बसले होते. दोन बोटी एकमेकांना बांधून त्यात प्रवासी खच्चून बसवले होते. ही बोट नदीच्या मध्यभागी असलेल्या हनुमानाच्या मूर्तीला धडकून फुटली.

हिंगणघाट येथील वणा नदीच्या दुसर्‍या तीरावर कान्हापूर, बोरगाव, खैराटी आणि दाभा ही चार गावं आहेत. या गावातील शेतात काम करण्यासाठी येथून दररोज जवळपास ३०० ते ४०० मजूर जातात. गुरूवारी सायंकाळी शेतातून काम करून परतणार्‍या मजुरांना घेऊन नाव गाडगेबाबा घाटावरून निघून शहराकाठच्या धोबी घाटावर येत होती.
दरम्यान, संतोष कापसे नामक नावाड्याला वणा नदीच्या मध्यभागी पाण्यात असलेल्या पाच फूट उंच मारुतीच्या मूर्तीचा अंदाज न आल्याने नाव मारुतीच्या मूर्तीवर आदळली. त्यामुळे नावेचे दोन तुकडे झाले. त्यामुळे नावेतील सर्व प्रवासी पाण्यात पडले. अपघात झाल्याचे लक्षात येताच नदीकाठावर असलेल्या लोकांनी नदीत उड्या मारून अनेकांना बाहेर काढले.
वृत्तलिहिस्तोवर वामन आगाशे ( ४०, रा. निशानपुरा) , प्रभाकर नारायण गिरडे (४० रा. टिळकवॉर्ड) यांना स्थानिक कुटीर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उर्वरित सहा मृतदेहांची ओळख पटू शकली नव्हती, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गाडे यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.