विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
गायरान जमिनीच्या वादातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिंधी सिरजगाव इथं पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढवून 15 ते 20 झोपड्या जाळल्या. या घटनेत सातजण जखमी झाले. गायरान जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असून या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.
औरंगाबाद-मुंबई हायवेवर असणा-या गंगापूर तालुक्यातल्या सिंधी सिरजगाव येथील पारधी लोकांच्या वस्तीवर रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात जमावानं अचानक सशस्त्र हल्ला केला. अचानकपणे झालेल्या हल्ल्यानं वस्तीमधील पारधी लोकांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या झोपड्यांना आगही लावण्यात आली. आगीत 15 ते 20 झोपड्या जळून खाक झाल्या. जमाव इतका बेभान होता की त्यांनी लहान मुलं आणि महिलांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पारधी वस्तीवरील ७ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ३० जणांवर एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून काही संशयित लोकांना अटक करण्यात आलीय.
सिंधी सिरजगावात 120 एकर गायरान जमीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाज तिथं राहत असून ही जमीनही ते कसत आलेत. या गायरान जमिनीवरून गावातील काही लोकांसोबत पारधी समाजाचा वाद आहे.या वादातून अनेकवेळा हाणामारीच्या घटनाही घडल्यात. पारधी समाजातील लोकांना तेथून हाकलून लावण्यासाठी रविवारी रात्री सशस्त्र हल्ला झाल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
खरं पाहता ही जमीन ना पारधी वस्तीतल्या लोकांची आहे ना गावक-यांची. ही जमीन सरकारची असून सरकारनं अनेक वर्षांपासून काही पारधी कुटुबियांना कसण्यास ही जमीन दिलीय. त्यामुळं या प्रकरणात दोन्ही बाजूंनी संयम ठेवण्याची गरज आहे.