www.24taas.com, मुंबई
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर संशयाची सुई दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरू लागली आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी, लष्कर-ए-तोयबा या संघटनांवर आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
अद्याप या स्फोटांची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. तसंच या स्फोटांची मोडस ओप्रंडीही अजून स्पष्ट झालेली नाही. दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्रालयाला अशा स्फोटांसंदर्भात पूर्वसूचना देण्यात आली होती.
एनआयएची सूत्रं स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा दावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या परिसरात यासीन भटकळ हा आतंकवादी रेकी करून गेला असल्याची माहिती काही सुत्रांकडून मिळत आहे.
इंडियन मुजाहिद्दीनने यापूर्वी दिल्ली, जयपूर, पुणे, अहमदाबाद आणि मुंबईतील स्फोट घडवून आणले होते. केंद्रीय गृह सचिव आर.के. सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र कुठल्याही अद्याप कुठल्याही संघटनेचा हात असल्याचं सांगितलेलं नाही.