www.24taas.com, अॅडिलेड
क्रिकेट प्रशिक्षक ग्रेग चॅपेल पुन्हा एकदा बरळले आहेत. चॅपेल गुरूने भारतीय संस्कृतीवर बोट ठेवले आहे. भारतीय संस्कृतीमुळे क्रिकेटमध्ये नवीन नेतृत्व भारतात तयार होत नाही, असा भन्नाट शोध लावला आहे. ग्रेग चॅपेलच्या या विधानावरून जोरदार टीका होत आहे.
भारतात क्रिकेटला महत्व असले तरी नवीन पिढी घडविण्यासाठी भारतीय संस्कृती आड येत असल्याचे म्हटले आहे. कारण कोणताही निर्णय हा मुलांचे आई-वडिल घेत असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये याचा प्रभाव दिसून येतो. शालेय शिक्षक, आई-वडिल आणि प्रशिक्षकच मुलाबाबतचा निर्णय घेत असतात. हिच मंडळी आपले निर्णय मुलांवर लादत असतात, असे भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे म्हणणे आहे.
लहान वयात मुले निर्णय घेत नाहीत. त्यांचे निर्णय हे मोठी मंडळी ठरवतात. हीच भारतीय संस्कृती आहे. मुलेही या संस्कृतीचे पालन करीत असल्याने मान वर करून बोलत नाहीत किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे एखादी जबाबदारी घेण्यास ती कमी पडतात. हीच बाब क्रिकेटमध्ये दिसून येत आहे. आज क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याला अपवाद ठरला आहे, ग्रेग चॅपेल यांनी म्हटले आहे.