www.24taas.com, मुंबई
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांना वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. आयपीएलचा लीग राऊंड संपायला मोजक्या मॅचेस बाकी असल्याने सर्व टीम्स विजयाची नोंद करून टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसून तयारीला लागल्या आहेत. त्यामुळेच फॅन्सना मुंबई विरूद्ध बंगळुरू मॅचमध्ये अनेक उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या सिझनमध्ये पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. मुंबई इंडियन्सना दमदार ओपनिंग करून देण्याची जबाबदारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जेम्स फ्रँकलिन यांच्यावर असणार आहे. सचिनला गवसलेला फॉर्म ही मुंबईसाठी बंगळुरूविरूद्ध नक्कीच जमेची बाजू ठरणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये रोहीत शर्मा आणि अंबाती रायडू जबाबदारीने खेळ करताना दिसत आहेत.
झहीर खान आणि मुथय्या मुरलिधरन विरुद्ध मुंबई इंडियन्स किती रन्स काढण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरेल. मात्र बंगळुरुकडेही तिलकरत्ने दिलशानसारखे विस्फोटक बॅट्समन आहेत. ख्रिस गेलने तर आपल्या बॅटनी कमाल करताना आयपीएलमध्ये सिक्सर्सची सेंच्युरी पूर्ण केली आहे. चॅलेंजर्सच्या बॅटसमनला रोखण्याची मुख्य जबाबदारी लसिथ मलिंगा, मुनाफ पटेल आणि आर. पी. सिंग या वेगवान त्रिकुटावर असणार आहे. या दोन्ही टीम्समध्ये असणाऱ्या तगड्या प्लेअर्समुळे क्रिकेट फॅन्सनी वानखेडेवर रंगतदार लढत पाहायला मिळणार हे मात्र नक्की.