ऑलिम्पिक ज्योत पेटली रे....

लंडन ऑलिम्पिकचे वेध आता सर्वांना लागले आहेत. ऑलिम्पिकची तयारी म्हणुन ग्रीसमधील प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे लंडन ऑलिम्पिक टॉर्चचं प्रज्वलन करण्यात आलं.

Updated: May 10, 2012, 04:05 PM IST

www.24taas.com, लंडन

 

लंडन ऑलिम्पिकचे वेध आता सर्वांना लागले आहेत. ऑलिम्पिकची तयारी म्हणुन ग्रीसमधील प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे लंडन ऑलिम्पिक टॉर्चचं प्रज्वलन करण्यात आलं. हेरा मंदिरात सुर्यकिरण आणि भिंगाच्या माध्यमातून, पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात ऑलिम्पिक टॉर्च प्रज्वलित करण्यात आली.

 

ही टॉर्च फिरवण्याचा पहिला मान ग्रीसचा वर्ल्ड चॅम्पियन स्विमर स्पायरोस गियानिओटिसला मिळाला. ऑलिम्पिक टॉर्च १७ मे पर्यंत ग्रीसमध्ये २९०० किलोमीटरचं अंतर फिरवली जाणार आहे. या प्रवासात ही टॉर्च ग्रीसच्या ४० शहरांमधून ४९० टॉर्च बेअरर्सच्या हातून प्रवास करणार आहे. यानंतर ऑलिम्पिक टॉर्च १८ मे रोजी ब्रिटनला रवाना होणार आहे.

 

तेथे ही टॉर्च लंडन ऑलिम्पिक समितीला सुपूर्द केल्यानंतर ही ऑलिम्पिक ज्योत संपुर्ण ब्रिटनमध्ये फिरवली जाणार आहे. आणि त्यानंतर आपला प्रवास पुर्ण करून ऑलिम्पिक ज्योत २७ जुलै रोजी लंडनमधील मुख्य ऑलिम्पिक स्टेडियममध्ये दाखल होणार असून,स्टेडियममध्ये ज्योत प्रज्वलित करून ऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे.