इंडियाचा ‘विराट’ विजय

विराट कोहलीचे झुंजार शतक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंडियाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून दणदणीत विजय साजरा केला.

Updated: Dec 3, 2011, 02:46 AM IST

झी २४ तास वेब टीम, विशाखापट्टणम

 

विराट कोहलीचे झुंजार शतक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंडियाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयाबरोबरच भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी आघाडी घेतली.

 

विंडीजने विजयासाठी ठेवलेल्या २७0 धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनकच झाली. धावफलकावर अवघ्या ३ धावा असताना रोचने सलामीवीर पार्थिव पटेल याला सॅमीकरवी झेलबाद करत माघारी धाडले. त्यापाठोपाठ गौतम गंभीरनेही तंबूचा रस्ता धरल्याने भारत पुन्हा एकदा ‘गंभीर’ परिस्थितीत अडकतो की काय, असा प्रश्न उपस्थित राहिला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने विडींज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार सेहवागही बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट या जोडीने चौथ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली.

 

विराटने १२३ चेंडूंचा सामना करत १४ चौकारांच्या साहाय्याने ११७ धावा केल्या. एकदिवसीय कारकिर्दीतले त्याचे हे आठवे शतक ठरले. रोहित शर्मानेही तडाखेबाज फलंदाजी करत नाबाद ९0 धावा केल्या. विजयाच्या समीप आल्यानंतर विराट बाद झाला. शेवटच्या चार षटकांत विंडीजनेही क्षेत्ररक्षणातही आक्रमकता आणली आणि यजमानांना प्रत्येक धावांसाठी झुंजवले

 

तर विंडीजच्या रवी रामपॉलने ६६ चेंडूंत ८६ धावांची तुफानी खेळी करताना केमर रोचसह शेवटच्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली आणि विंडीजला २६९ धावांपर्यंत मजल मारून दिली.