'स्पेस टॅक्सी’साठी नासा खर्च करणार अब्जावधी!

अंतराळ यानांची सेवा संपल्यानंतर आता अमेरिकाला आपल्या अंतराळ यात्रींना अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी रशियावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेचा आता ‘स्पेस टॅक्सी’ बनविण्याचा मनोदय आहे.

Updated: Sep 26, 2011, 04:04 PM IST

रशियाची मक्तेदारी संपविण्यासाठी अमेरिकेची तयारी

झी 24 तास वेब टीम, वॉशिंग्टन

अंतराळ यानांची सेवा संपल्यानंतर आता अमेरिकाला आपल्या अंतराळ यात्रींना अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी रशियावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘स्पेस टॅक्सी’ बनविण्याचा मनोदय केला आहे. यासाठी नासा पुढील दोन वर्षांत 1.6 अब्ज अमेरीकन डॉलर खर्च करण्याची योजना बनवत आहे.

‘ द डेली टेलिग्राफ ’ ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार नासा या दशकाच्या मध्यापर्यंत अंतराळ प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी ‘स्पेस टॅक्सी’ बनवत आहे. ही ‘स्पेस टॅक्सी’ प्रकल्पात प्रवाशांची ने-आण, अंतराळ यान, मिशनचे संचालन आणि जमिनीवरील सहकार्य याची संपूर्ण व्यवस्था करणार आहे. व्यावसायिक तत्वावर अंतराळात प्रवासी घेऊन जाण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून या प्रकल्पात गुंतवणुकीची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या अमेरिकेच्या आर्थिक वर्षात यासाठी 85 कोटी डॉलर देण्याचा आग्रह केला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यात 50 कोटी डॉलर मंजूर केले आहे. 16 देशातर्फे पृथ्वीपासून 225 किलोमीटर अंतरावर 100 अब्ज डॉलर खर्च करून एक नवीन स्पेस स्टेशन बनविण्याचे काम सुरू आहे. रशिया सध्याच्या स्पेस स्टेशनवर अंतराळ प्रवाशांना पाठविण्याच्या प्रक्रियेसाठी पाच कोटी डॉलरची आकरणी करीत असल्याने अमेरिकेने ही नवी योजना केली आहे.