Republic Day Parade: भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो. यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. मात्र यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला अद्याप स्थान मिळाले नसल्याचे वृत्त समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे समोर येतंय. राजधानीच्या चित्ररथाला नाकारण्याची ही चौथी वेळ आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "मागील कित्येक वर्षांपासून दिल्लीच्या चित्ररथाला संचलनात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. हे कसले राजकारण? दिल्लीच्या लोकांचा हे इतका का तिरस्कार करतात?" असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांच्या चित्ररथांची निवड वेगवेगळ्या नियोजित निकषांनुसार केली जाते. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे चित्ररथांच्या निवडीची प्रक्रिया आयोजित केली जाते. या प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी विविध राज्ये, क्रेंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांकडून प्रस्ताव मागवण्यापासून होते. या प्रस्तावात चित्ररथांसाठी एक विशिष्ट विषय नमूद केला जातो आणि हा विषय भारतीय संस्कृती, परंपरा, विशेष राष्ट्रीय कामगिरी किंवा उपक्रमासंबंधी असतो. चित्ररथांमधील नाविन्य आणि विविधतेसाठी हा विषय दरवर्षी बदलत राहतो. संचलनात चित्ररथांच्या कल्पक विषयाला अधिक महत्त्व दिले जाते.
प्रस्ताव स्विकारल्यानंतर कलाकार, इतिहासकार आणि सांस्कृतिक विशेषज्ञांचा समावेश असलेली एका समिती तयार केली जाते. ही समिती चित्ररथांची कलाकृती आणि त्यातील संदेशाकडे लक्ष देण्याचे काम करते. चित्ररथांच्या कलाकृतीची रचना आणि त्यातील संदेशावरुन ही समिती चित्ररथांची निवड करण्याचे काम पार पाडते. चित्ररथांमधील राष्ट्रीय आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन निवड केली जाते.
समितीच्या परिक्षणादरम्यान सदस्य चित्ररथांच्या डिझाइनसंबंधी बदल करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार चित्ररथांमध्ये बदल केला जातो आणि नंतर पुन्हा समितीसमोर सादर केला जातो. अंतिम निवड 6 ते 7 फेऱ्यांमध्ये केली जाते. यात समिती 3-डी मॉडेलचा तपास करते. या प्रक्रियेनंतर चित्ररथांच्या निर्मितीचे काम सुरु होते. संचालनाच्या आगोदर खूप वेळा चित्ररथाचा अभ्यास केला जातो.
चित्ररथांच्या प्रदर्शनादरम्यान एका सर्वोत्कृष्ट चित्ररथाची निवड केली जाते आणि नंतर पुरस्कार दिले जातात. तज्ज्ञांची समिती चित्ररथांचे परिक्षण करते आणि वेगवेगळ्या निकषांवरुन पुरस्कारासाठी त्यांची निवड केली जाते. चित्ररथांद्वारे भारताची विविधता आणि परंपरा उत्तमरित्या प्रदर्शित केली जावी, हाच या पुरस्काराचा उद्देश असतो.