www.24taas.com, निखील चौकर, अहमदनगर
15 हजार रुपये भरा, कंपनीचे सभासद व्हा आणि 2 वर्षांनंतर आजीवन दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळवा’ अशी फसवी योजना जाहीर करून नगरकरांना 15 कोटींचा गंडा घालणारी बदमाश कंपनी अखेर पर्दाफाश झाला. नगरसह कोल्हापूर, नाशिक, बीड, उस्मानाबादपर्यंत या बदमाश कंपनीनं जाळं पसरवल्याचं समोर आलं. पंधरा हजार रुपये गुंतवणूक करून कंपनीचे सभासदत्व घ्यायचे.
त्यानंतर तीन महिन्यांनी ५०० तर २१ महिन्यांनंतर ९७ लाख ६५ हजार रुपये परत मिळवा आणि दोन वर्षांनंतर मरेपर्यंत पाच हजार रुपये पेन्शन. अशी फसवी योजना वेध सेक्रेड लाईफ मल्टीट्रेड कंपनीनं जाहीर केली आणि भोळी जनता याला भुलली. या योजनेची सत्यता पटविण्यासाठी पहिल्या काही जणांना कंपनीने बोनसही दिला तर काहींना नॅनो, अल्टो कारचे वाटप केले. बक्षिसांच्या आकर्षणाला बळी पडून नगरमधल्या जवळपास ९ हजार जणांनी 15 कोटींची गुंतवणूक केली. योजनेचा शेवटही अपेक्षेप्रमाणेच झाला. कंपनीने बोनस देण्यास टाळाटाळ केल्याने काहींनी पोलिसांकडे धाव घेतली आणि या बदमाश कंपनीचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी सफारी आणि इतर कारही पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अँक्सिस बॅँकेचे कंपनीचे खातेही गोठविले आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून रकमेचा आकडाही वाढू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातही फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असून तेथेही कोट्यवधी रुपयांना गुंतवणूकदारांना फसविण्यात आल्याची माहिती समोर आलीय. अशा अनेक कंपन्या आल्या आणि लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडाही घालून गेल्या. मात्र यातून धडा घेतील ती आपली भोळी जनता कसली ?