www.24taas.com, पुणे
ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बापट हे राज्याशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक होते. त्यांनी पुणे विद्यापीठासह अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष ज्ञानदानाचे काम केले.
बापट यांचा वेगवेगळ्या विषयांचा व्यासंग होता, अनेक विषयांचं त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं. लिखाणापेक्षा त्यांचा भर व्याख्यानांवर होता. नाटकशास्त्र, सौंदर्यशास्त्र याविषयांचा अभ्य़ास करून त्यांनी त्यावरही शिबिरांतून व्याख्यानं दिली. काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उत्तर आधुनिकतावादावर १४ व्याख्यानांची मालिका तयार केली होती.
बापट यांच्यावर लोकशाही समाजवादी विचारांचा खोल प्रभाव होता. डॉ. राम मनोहर लोहियांच्या विचारांनी ते प्रेरीत होते. बापट यांनी सातत्यानं विविध विषयांवर महाराष्ट्राच्या जनतेशी सवांद साधत विचारांची चळवळ जिवंत ठेवण्यात मोठं योगदान दिले आहे.